स्थैर्य, फलटण : शहरामध्ये सध्या कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरातील परिस्थिती गंभीर झालेली असतानाही काही बेजबाबदार नागरीकांकडून आपल्या व्हॉटसअप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, सोशल मेसेजींग ऍप, फेसबुक मेसेंजर, टेलीग्राम, हॅंगआऊट, स्नॅपचॅट तसेच व्हिडीओ मेसेजींग/पब्लिशिंग ऍप्लिकेशन, युट्युब या सोशल मिडीयावर सर्रासपणे खोटी माहिती, व्हिडीओ, ऑडीओ क्लिप पाठविली जात आहे. विशेषतः नागरिकांकडून संबंधीत माहितीची कोणत्याही प्रकारची पडताळणी केली जात नाही. अशा अफवांमुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊन नागरीकांची दिशाभूल होऊन भिती निर्माण होते. या प्रकाराची पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने गांभीर्याने दखल घेतली आहे. आता कोरोनाबाबत खोटी माहिती, बातम्या व अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कलम 188 नुसार व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती फलटण पोलीस उपविभागाचे उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी दिली.
तुम्ही कोरोना विषाणूबाबत सोशल मिडीयावर खोटी माहिती, अफवा पसरवताय, तर आता पोलिस तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार हे निश्चित. केवळ तेवढेच नाही, तर संबंधीत व्यक्तींना पोलिसांकडून अटकही केली जाणार असून त्यामुळे आता कोरोनासंदर्भात कुठलीही माहिती व जुन्या बातम्या सोशल मिडीयावर पाठवताना जरा काळजी घ्याच, अन्यथा तुमच्यावर गुन्हा नोंद केला जाईल असेही उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी स्पष्ट केले.
कोरोनासंर्भात प्रसारीत केल्या जाणारी ही माहिती खोटी आहे,
फॉरवर्ड केल्यास होणार गुन्हा दाखल
- कोरोनापासून वाचण्यासाठी घरगुती व आयुर्वेदीक उपाय
- कोरोनाबाधीत लोकांची नावे, संपर्क, पत्ता संपर्कात आलेल्यांची नावे.
- कोरोनाशी संबंधीत तज्ज्ञांची मते, फोटो, ऑडीओ-व्हिडीओ क्लिप्स
- लॉकडाऊनसंबंधी सुचना व कालावधी
- जातीय, धार्मिक तेढ वाढविणारे मेसेज पाठविणे
- कोरोना पिडीतांचे फोटो, व्हिडीओ, ऑडीओ प्रसारीत करणे
- कोरोनाबाबत भितीचे वातावरण निर्माण करणारे मेसेज पाठविणे
“कोरोनासंबंधी नागरिकांकडून सोशल मिडीयाद्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या मेसेज, व्हिडीओ, ऑडीओ क्लिप, फोटो यामुळे थेट समाजावर परिणार होतो. राज्य सरकारकडून खात्रीलायक माहिती वेळोवेळी प्रसिद्ध केली जाते. खोटी माहिती व अफवा पसरविणे हा कायद्याने गुन्हा असल्याची माहिती असूनही ती पसरविली जात आहे. त्यामुळे अशा व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे. नागरीकांनीही खोटी माहिती व अफवा पसरवू नयेत.”
– तानाजी बरडे, पोलिस उपअधीक्षक, फलटण.