

जाधववाडी (फलटण) येथील कै. सुरेश धोंडिबा जमदाडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या मुलांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस विविध क्रीडा साहित्य भेट देऊन एक अनोखा व स्तुत्य उपक्रम राबवला.
स्थैर्य, जाधववाडी (फलटण), दि. 5 मे : जाधववाडी (ता. फलटण) येथील कै. सुरेश धोंडिबा जमदाडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांकडून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस विविध खेळांचे साहित्य भेट देण्यात आले. समाजात एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या या अनोख्या उपक्रमाने त्यांचा प्रथम स्मृतिदिन नुकताच साजरा करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. शहाजी जाधव यांच्याकडे कै. सुरेश जमदाडे यांचे सुपुत्र अजित सुरेश जमदाडे, सुजित सुरेश जमदाडे आणि शक्ती सुरेश जमदाडे या तीनही बंधूंनी हे क्रीडा साहित्य सुपूर्त केले.
■ वडिलांच्या समाजसेवेचा वारसा जोपासला:
कै. सुरेश जमदाडे हे फलटण, माण, माळशिरस आणि बारामती तालुक्यामध्ये एक अत्यंत प्रामाणिक, वक्तशीर आणि शिस्तप्रिय बांधकाम व्यावसायिक म्हणून सर्वपरिचित होते. त्यांच्या पश्चात, ‘आपणही समाजाचे काही देणे लागतो’ ही कृतज्ञतेची भावना डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या या तीनही मुलांनी वडिलांच्या समाजसेवेचा आणि नि:स्वार्थ मदतीचा वारसा पुढे नेण्याचा मानस या स्तुत्य कृतीतून दाखवून दिला आहे.
■ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद:
१ मे २०२६ रोजी शाळेचा वार्षिक निकाल असल्याने सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रशालेला क्रिकेट साहित्य, क्यूब्स (Cubes), फुटबॉल, बॅडमिंटन, सापशिडी, बुद्धिबळ पट (Chess) इत्यादी विविध खेळांचे साहित्य भेट देण्यात आले. हे नवीन आणि आकर्षक क्रीडा साहित्य पाहून उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहत होता.
याप्रसंगी बोलताना कै. सुरेश जमदाडे यांचे थोरले चिरंजीव अजित जमदाडे यांनी आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच मैदानी आणि बौद्धिक खेळांमधून आरोग्याचे महत्त्वही समजण्यास मोठी मदत होईल, याच उद्देशाने हे साहित्य भेट देण्यात आले आहे.”
या कार्यक्रमावेळी जाधववाडी (फ) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. नानासाहेब जमदाडे, महेश जमदाडे, माधव जमदाडे, हिम्मतराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी, विद्यार्थ्यांचे पालक आणि जाधववाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.
