बाहेरुन आलेले काही जण महाराष्ट्राचे ऋण मानतात, काही जण मानत नाहीत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाव न घेता कंगनाला सुनावले


स्थैर्य, मुंबई, दि.७: मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणाऱ्या आणि मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या कंगनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या शैलीत सुनावले आहे. बाहेरुन आलेले काही जण महाराष्ट्राचे ऋण मानतात, काही जण मानत नाहीत असे कंगनाचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहताना ते सभागृहात बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “माझा ज्या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाही, अशा अनिलभैया राठोड यांना मला श्रद्धांजली वाहावी लागत आहे. अनिल भैया हा आमचा, शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता. अनेक जण इतर प्रांतातून मुंबई आणि महाराष्ट्रात येतात. रोजी रोटी कमावतात, नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचे ऋण मानतात, काही जण मानत नाहीत. अनिल भैया राजस्थानमधून महाराष्ट्रात आले. आधी मुंबई, मंचर आणि तिथेही मन रमेना म्हणून नगरला गेले. ज्यूसचा गाडीवाला माणूस ध्यानीमनी नसताना आमदार आणि मंत्री झाला. शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी काम सुरू केले. पण विचारांशी बांधिलकी, सक्रीय काम करत हा ढाण्या वाघ, जनतेचा माणूस होऊन काम करत राहिला.” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

सामनातून अग्रलेखात केले होते कंगना विरोधाचे आवाहन

शिवसेनाने आपल्या मुखपत्रातून लिहिलेल्या अग्रलेखात कंगनाचे नाव न घेता तिला मेंटल असे म्हटले आहे. सोबतच महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या आणि महाराष्ट्रात येऊन खाऊन पिऊन तरारलेल्याचा सभागृहात विरोध व्हायला हवा असे आवाहन केले होते. कंगनाने सुशांत मृत्यू प्रकरणावर अनेक दिवसांपासून खुलासे करण्याचा दावा करत व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्ट जारी केले. त्यामध्ये मुंबई पोलिसांवर टीका करता-करता तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर याला कंगना विरुद्ध शिवसेना असे वळण लागले. पण, विधानसभेच्या अधिवेशनात पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा तिचा निषेध केला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!