स्थैर्य, नागपूर, दि.२२: वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट कार्यालयावर आज अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू निघाले होते. पण, पोलिसांनी त्यांना नागपुरातच अडवले.
दरम्यान, अजूनही बच्चू कडू सिंचन विभागाच्या गेस्ट हाउसवर अडकून आहेत. त्यांना नागपूरच्या विमानतळावर जाऊ दिले जात नाहीये. गेस्ट हाउसच्या परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत शेतकऱ्यांच्या विविध संघटना एकत्र येणार आहेत. वांद्रा उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोर्चाची सुरुवात होणार आहे.
बच्चू कडू म्हणाले, सकाळी विमानतळावर जाण्यासाठी बाहेर निघालो असता पोलिसांनी आम्हाला थांबवले आणि आपल्याला येथून जाऊ न देण्याचे आदेश असल्याचे त्यांनी सांगितले. माझे विमान सकाळी ९.११ वाजताचे होते, ते हुकले आहे. या प्रकाराबाबत मी फोनवरून माहिती घेत आहे, की थांबवण्याचे कारण काय? आजचा मोर्चा शांततेनेच होणार आहे, तरीसुद्धा अडवून ठेवण्यामागचे कारण कळले नाही. नेमके कोण अडवत आहे, याचा शोध आम्ही घेत आहोत. मी नाही गेलो तरी आजचे आंदोलन होणारच असल्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले, मोर्चा नक्की निघेल. सर्व जण तेथे पोहोचले आहेत. आमचे कार्यकर्तेदेखील पोहोचले आहेत आणि मीसुद्धा मुंबईला लवकरच पोहोचणार आहे. अजून दोन विमान आहेत. तरीही अडवले तर मी माझ्या पद्धतीने पोहोचेनच, असे स्पष्ट संकेत बच्चू कडू यांनी दिले आहेत. त्यांची पद्धत कोणती हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही. पण, त्यांची पद्धत नेहमी वेगळीच राहिली आहे. त्यामुळे ते आता काय करतील, याकडे माध्यमांचे लक्ष लागून राहिले आहे. मोर्चा १२ वाजता निघणार आहे आणि १२ ते १५ हजार शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चात बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, हमाल पंचायतीचे प्रमुख बाबा अढाव आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर सहभागी होणार आहेत. यांपैकी बच्चू कडू नागपुरात अडकून पडले आहेत.