श्रीराम कारखान्याने संपर्क यंत्रणा कार्यान्वित करुन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे : ना.श्रीमंत रामराजे


स्थैर्य, फलटण दि.२९: फलटण तालुक्यातील वाढते ऊस क्षेत्र लक्षात घेवून शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी श्रीराम कारखान्याने सक्षम संपर्क यंत्रणा कार्यान्वित करावी. या यंत्रणेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकर्‍यांच्या कायम संपर्कात राहून त्यांना कृषी विषयक माहिती, बाजार भाव, कीटकनाशके, खते याविषयी मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

श्रीराम सहकारी साखर कारखान्याची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. त्यावेळी ना.श्रीमंत रामराजे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे होते. आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन भोसले व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक सी. डी. तळेकर, हंबीरराव भोसले, मालोजी बँकेचे व्हा. चेअरमन सुरेश गांधी यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

ना.श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आपण कृषीविषयक मार्गदर्शन करु शकतो. ऊसासोबत इतरही शेती पिकांची माहिती कारखान्याने शेतकर्‍यांना पुरवली तर ते फायदेशीरच ठरेल. परिसरातील वाढते ऊस क्षेत्र लक्षात घेता श्रीरामने देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे असून त्यामाध्यमातून शेतकर्‍यांचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही ना.श्रीमंत रामराजे यांनी यावेळी आवर्जून सांगीतले.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, 15 वर्षांपूर्वी श्रीराम सहकारी साखर कारखाना अवसायनात काढण्याचा सल्ला आपल्याला अनेकांनी दिला होता. परंतू ना.श्रीमंत रामराजे यांनी कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद पडू देयचा नाही अशी आग्रही भूमिका घेतल्याने हा कारखाना पुन्हा जोमाने सुरु झाला. कारखान्यात आजही अनेक सुधारणा आवश्यक असून त्यासाठी कारखाना प्रशासन ना.श्रीमंत रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. कार्यकारी संचालक सी. डी. तळेकर यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. संचालक संतोष खटके यांनी सूत्र संचालन केले तर संचालक सुखदेव बेलदार पाटील यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!