
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध स्पर्धा, फूड फेस्टिवल आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
स्थैर्य, फलटण, दि. 16 ऑक्टोबर : फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात विद्यार्थिनींनी फूड फेस्टिवल, व्यवसाय कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतून आपल्या कलागुणांचे यशस्वी प्रदर्शन घडवले.
व्यवसाय कौशल्य आणि फूड फेस्टिवल
महोोत्सवाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींसाठी विविध खेळ, फूड फेस्टिवल आणि सक्षम व्यवसाय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षा सविता सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत फूड फेस्टिवलचे उद्घाटन झाले. सचिव सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या व्यवसाय कार्यशाळेत विद्यार्थिनींनी टाकाऊतून टिकाऊ वस्तू, रांगोळी आणि पणत्यांचे प्रदर्शन मांडून आपले कौशल्य सिद्ध केले. याशिवाय पारंपरिक ‘भोंडला’ देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसाद
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संस्थेचे पदाधिकारी आणि प्राचार्यांच्या उपस्थितीत देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर विद्यार्थिनींनी तयार केलेल्या ‘अंकुर’ या हस्तलिखिताचे अनावरण व गुणवंत विद्यार्थिनींचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाने सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. महोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात पोपटराव नाळे यांचे ‘कर्म आणि परमार्थ’ या विषयावर कीर्तन झाले. कीर्तनानंतर श्रीराम संकुलातील शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.





