फलटणमध्ये श्री संत सावता महाराज समाधी सोहळा सप्ताह ५ ऑगस्टपासून

आठ दिवस एस. टी. स्टँडजवळील मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन आणि भव्य दिंडी

दैनिक स्थैर्य | दि. २ ऑगस्ट २०२६ | फलटण |
श्री क्षेत्र फलटण येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा सप्ताह यंदा मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे. श्री संत सावता महाराज मंदिर, एस. टी. स्टँडनजीक येथे हा अखंड हरिनाम सप्ताह बुधवार दि. ५ ऑगस्ट ते बुधवार दि. १२ ऑगस्ट २०२६ दरम्यान संपन्न होईल.

वै. गुरुवर्य पांडुरंग महाराज वैध्या, आळंदी यांच्या कृपाशिर्वादाने व ह.भ.प. आदिनाथ महाराज फपाळ, माजलगाव यांच्या प्रेरणेने श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट, फलटण यांच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

दररोजचे कार्यक्रम
सप्ताहात पहाटे ४ वाजल्यापासून रात्री १२ पर्यंत धार्मिक कार्यक्रम होतील. काकडा भजन पहाटे ४ ते ६, गाथा भजन सकाळी ९ ते ११, महिला भजन सकाळी ११ ते ४.३०, हरिपाठ सायं. ६ ते ७, प्रवचन सायं. ५ ते ६ आणि रात्री ७ ते ९ संकिर्तन व कीर्तन होणार आहे. गाथा भजनाचे नेतृत्व ह.भ.प. मारुती महाराज शिंदे व ह.भ.प. महादेव महाराज घिटे करणार आहेत.

मान्यवरांची उपस्थिती
या सप्ताहात ह.भ.प. रामचंद्र महाराज जगताप, ह.भ.प. संभाजी महाराज तांबे, प्राचार्य रविंद्र येवले, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे, ह.भ.प. चैतन्य महाराज निंबोळे, ह.भ.प. भागवत महाराज शिंदे ह. भ. प चंदावड सर, ह.भ. प. साहेबराव महाराज पडेर, ह. भ. प अनिकेत महाराज,ह. भ. प संदिप महाराज पळसे , ह. भ. प. देवेद्र महाराज निबाळकर, संकेत महाराज यादव यांसारखे राज्यातील नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार उपस्थित राहून सेवा देणार आहेत.

११ ऑगस्टला भव्य मिरवणूक
सप्ताहातील प्रमुख आकर्षण म्हणजे मंगळवार दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. होणारी वारकरी सांप्रदाय दिंडी सोहळ्यासह भव्य मिरवणूक होय. श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पादुका प्रतिमेची मिरवणूक नगरीतून काढण्यात येणार आहे. याच दिवशी रात्री ८ ते १० ह.भ.प. भागवत महाराज शिंदे यांचे कीर्तन होईल.

सप्ताहाचा समारोप बुधवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प. आदिनाथ महाराज फपाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल. संपूर्ण सप्ताहात दुपारी २ ते रात्री ८पर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या सोहळ्याचे संयोजन श्री. दादासाहेब आप्पाजी शेंडे व अध्यक्ष श्री. मुनिश माधवराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर ट्रस्ट करीत आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!