माऊलींचा पालखी सोहळा तरडगाव मध्ये विसावला; पावसामुळे तळावर तारांबळ


दैनिक स्थैर्य | दि. 08 जुलै 2024 | तरडगाव | आषाढी वारीने श्री विठ्ठल भेटीस निघालेला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मजल दरमजल करीत दोन दिवसापुर्वी लोणंद मुक्कामी पोहोचला होता. अडीच दिवसाच्या लोणंद मुक्कामी माउलींच्या दर्शनासाठी कर्नाटक राज्यासह कोल्हापूर, सातारा, सांगलीसह कोकण भागातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आळंदी ते लोणंद हा वाटचालीतील अर्धा टप्पा पुर्ण करुन आज (सोमवार) हा सोहळा दुपारी १ वाजून ३० वाजता तरडगावकडे मार्गस्थ झाला. ढगाळ वातावरणात वारकऱ्यांची वाटचाल सुखकर होत होती. टाळ मृदुंगाच्या साथीने भजनात रंग भरला होता. मध्येच येणारी पावसाची सर वाटचालीत उत्साह निर्माण करीत होती. वारकऱ्यांची पावले पहिल्या उभ्या रिंगणासाठी चांदोबाचा लिंबकडे पडत होती. पोलिसांनी वाहतुक व्यवस्था सुरळीत केल्याने तसेच लोणंद नगरपंचायतीने अडीच दिवस आरोग्य, वीज, पाणी पुरवठा आदी सुविधा व्यवस्थित पुरविल्याने वारकऱ्यांना कोठेही त्रास झाला नाही.

पहिल्या उभ्या रिंगणासाठी माउलीचा मोती व स्वाराचा हिरा अश्व दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी चांदोबाचा लिंब येथे पोहोचले. त्यानंतर आपल्या वैभवी लवाजम्यासह लाखोंचा दळभार घेवुन माउलीचा रथ सायंकाळी ४ वाजता पोहोचला. उध्दव चोपदार यांनी रस्त्याच्या दुतर्फा दिंड्या उभ्या केल्या. भोसरीच्या राजश्री भागवतने रांगोळ्याच्या सुंदर पायघड्या घातल्या आणि सायंकाळी सव्वाचार वाजता रिमझीम पावसाच्या सरी अंगावर झेलीत अश्वांनी माउली माउली नामाच्या जयघोषात नेत्रदीपक दौड सुरु केली. अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. अश्व रथा मागील ३२ दिंड्यांपर्यंत धावले. रथाजवळ आल्यावर अश्वानी माउलींचे दर्शन घेतले. प्रमुख विश्वस्थ ॲड. राजेंद्र उमप व विश्वस्थ भावार्थ देखणे यांनी रथाचे सारथ्य केले. आरतीनंतर पावसातच दिंड्या दिंड्यामध्ये विविध खेळ रंगले. सायंकाळी सोहळा तरडगाव मुक्कामी पोहोचला.

काल रविवारी रात्री व आज तरडगाव परिसरात पाउस झाल्याने पालखी तळ चिखलमय झाला होता. वारकऱ्यांना राहुट्या लावणेही अशक्य झाले होते. माउलींची पालखी जेथे मुक्कामी थांबते तेथेही चिखल झाला होता. सोमवारी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, व्यवस्थापक माउली वीर यांनी तळाला भेट देवून प्रशासनाला सुचना केल्या. या परिसरात मुरुम टाकल्याने तळ मजबुत झाला. याच तळावर सोहळा विसावला आहे.

ड्रोन पडून महिला जखमी

संतांच्या पालखी सोहळ्याचे, रिंगणाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करु नये असे पोलिस प्रशासनाने कळवूनही आज चांदोबाचा लिंब येथील रिंगण सोहळ्याचे वेळी १२ अनधिकृत ड्रोनद्वारे चित्रीकरण सुरु होते. त्यापैकी अश्व ३२ क्र्मांकाच्या दिंडीजवळ येताच एक ड्रोन पडत्या पावसात कोसळले व त्याचा मार दिंडीतील एका महिलेच्या तोंडाला लागला व त्यात ती जखमी झाली. ड्रोन कोनाचा होता हे मात्र कळले नाही.


Back to top button
Don`t copy text!