स्थैर्य, पुणे, दि.१९: मुंबईचा ठेका फक्त
शिवसेनेलाच दिलेला नाही. आम्ही पण मराठी आहोत आणि भाजपमध्येही मोठ्या
प्रमाणात मराठी माणसे आहेत, असे सांगतानाच मुंबईत हिंदुत्वाचा भगवा झेंडा
कोणाच्या हाती द्यायचा हे आगामी महापालिका निवडणुकीत जनताच ठरवेल, अशा
शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी
शिवसेनेला आव्हान दिले. महाराष्ट्रात काँग्रेसला उद्ध्वस्त करण्याचा डाव
शिवसेना आणि राष्ट्रवादीने रचला आहे, असा दावाही दरेकर यांनी यावेळी केला.
भगवा झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा
आहे. शिवसेनेला त्याचे पेटंट कुणी दिलेले नाही, असे नमूद करताना आयुष्यभर
हिंदुत्वाला विरोध करणाºया पक्षाशी केवळ सत्तेसाठी मैत्री करून तुम्ही
एकप्रकारे भगव्याशी प्रतारणाच केली आहे, अशी तोफही दरेकर यांनी शिवसेनेवर
डागली.
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील भाजपचे
उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर
पुण्याच्या दौºयावर आहेत. यानिमित्ताने पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत
बोलताना ठाकरे सरकारच्या कारभारावर दरेकर यांनी जोरदार टिका केली.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत
भाजपच्या कार्यकारिणीत जे ८-१० प्रमुख मुद्दे मांडले त्यातील एकाही विषयावर
शिवसेनेला स्पष्टीकरण देता आले नाही. कारण शिवसेनेला विकासाच्या मुद्यावर
बोलायचे नाही केवळ भावनिक वातावरण तयार करायचे आहे. कधी राज्यपाल, तर कधी
केंद्र सरकारच्या विषयावरुन वाद घडवून आणायचा आहे, इतकेच त्यांना माहीत
आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार तीन
पक्षांचे असले तरी यामध्ये फक्त शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचेच
अस्तित्व दिसत आहे. काँग्रसेला मात्र डावलले जात आहे. राष्ट्रवादी व
शिवसेनेकडून काँग्रेसची सातत्याने फरफट होत आहे. या ठाकरे सरकारमध्ये
कोणत्याही प्रकारचा संवाद व ताळमेळ दिसत नाही, असेही दरेकर म्हणाले.
पदवीधरांचे विविध प्रश्न व समस्या या सरकारच्या काळात आहेत. या सरकारने
शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे. रोजगाराचा व स्वंयरोजगाराचे प्रश्नही
प्रलंबित आहेत. त्यामुळे या सर्व प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी व
पदवीधरांचा आवाज विधिमंडळात पोहचवण्यासाठी उमेदवार संग्राम देशमुख यांना
विजयी करण्याचे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले.