जिओ डिजिटलच्या चुकीच्या खुदाई विरोधात शिवसेना आक्रमक; एक फेब्रुवारीपर्यंत प्रशासनाला मुदत अन्यथा तीव्र आंदोलन


स्थैर्य, सातारा,  दि.२४: जिओ डिजिटल फायबर व टाटा टेली सर्विस यांनी सातारा जिल्हयातील पस्तीस रस्त्यामध्ये केबल खुदाई चुकीच्या पध्दतीने करून सातारा जिल्हा परिषदेचे पन्नास कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केला .

जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून या संदर्भात १ फेब्रुवारी पर्यंत निर्णय न झाल्यास शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मोहिते यांनी दिला . ते पुढे म्हणाले, जिओ डिजिटल फायबर कंपनी व टाटा टेली सर्विस यांनी सातारा जिल्हयातील पस्तीस रस्त्यांची खुदाई करून साईडपट्ट्यांमध्ये केबल टाकण्याचे काम केले .नियमाप्रमाणे साईडपट्टी वगळून लगतच्या जागेमध्ये केबल टाकण्याचा नियम आहे . मात्र ठेकेदार कंपन्यांनी एक लाख चाळीस हजार मीटरचे रस्ते चुकीच्या पध्दतीने खोदून सातारा जिल्हा परिषदेचे पन्नास कोटी रुपयांचे नुकसान केले आहे . आणि साईडपट्टयांच्या खोदलेल्या चरी केवळ माती टाकून बुजवण्यात आल्या या चरी बारीक खडीने बुजवायच्या असताना संबंधित ठेकेदारांनी याची काळजी घेतली नाही . जिओ केबल ला हा ठेका 2017 मध्ये देण्यात आला होता . या प्रकरणा संदर्भात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला वेळोवेळी कागदपत्र व छायाचित्रांचे पुरावे देण्यात येऊनही अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची तक्रार शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली . काही अधिकाऱ्यांचे या प्रकरणात लागेबांधे असल्याचा आरोप मोहिते यांनी केला . आलवडी ते परळी फाटा हा 31 किलोमीटरचा रस्ता चुकीच्या पध्दतीने खोदला गेल्याने येथे अपघात झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले .

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून ठेकेदार कंपनीला तातडीने दंड करावा अन्यथा या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा मोहिते यांनी दिला . शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला १ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात येत असून या दरम्यान कोणताही निर्णय न झाल्यास शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला .

यावेळी सातारा तालुका प्रमुख आतिश ननावरे, उप तालुका प्रमुख तानाजी चव्हाण, युवा सेना पदाधिकारी सागर रायते, सुनील मोहिते, राम घोरपडे इं पदाधिकारी उपस्थित होते .


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!