स्थैर्य, वावरहिरे दि.२२: ग्रामपंचायत निवडणुकीची जोरदार रणधुमाळी चालू असताना माण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपुर्ण समजल्या जाणार्या शिखर शिंगणापुर ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय व युवापिढीच्यावतीने जोरदार प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. निवडणुक बिनविरोध झाल्यास गावाध्ये एकी निर्माण होऊन एक वेगळा आदर्श समाजापुढे तयार होईल. गावाच्या विकासासाठी व आदर्श गाव निर्माण करण्यासाठी गावातील युवा पिढी पुढे सरसावली आहे.
मोहन पाटील (दादा), ज्येष्ठ पत्रकार दिपक तडें (बडवे) यांच्या पुढाकाराने पोलीस पाटील संतोष बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय व ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व पक्षातील पदाधिकार्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्यास पाठिंबा दर्शवला. सुरेश बडवे, राजाराम बोराटे, अभय मेनकुदळे, वीरभद्र कावडे (सर), दगडू ठोंबरे(अण्णा) ,शंकर तांबवे, अनिल बडवे (दादा), डॉक्टर अतुल बंदुके (भैय्या), ऋषिकेश हजारे ( बाबा), माणुसकी प्रतिष्ठान, संजय बडवे ( काका) या पक्षप्रमुखांनी ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली. तसेच नवीन तरुणांना संधी देण्याची ग्रामस्थांची भूमिका वरील सर्व नेत्यांनी मान्य करून आपण सर्वजण यापुढे निवडणूक न लढवता तरुणांच्या पाठीशी उभे राहू, असा शब्द दिला व एक नवीन आदर्श गाव शिखर शिंगणापूर असेल असा विश्वास व्यक्त केला. या राजकीय पदाधिकार्यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राचे कुलदैवत शिखर शिंगणापूर नक्कीच आदर्श गाव निर्माण होईल अशी समाधानाची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.