
थेट WhatsApp वर मिळवा
मध्य रेल्वेने स्वच्छता मोहिमेअंतर्गत रेल्वे स्थानकांवरील दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या दुकानांसाठी विक्रीचे नवे नियम लागू केले असून, या दुकानांमध्ये चहा, कॉफी आणि शिजवलेले खाद्यपदार्थ विकण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. २२ ऑक्टोबर : मध्य रेल्वेने विशेष स्वच्छता मोहीम ६.० अंतर्गत मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागांतील रेल्वे स्थानकांवरील नॉन-फेअर रेव्हेन्यू योजनेअंतर्गत चालणाऱ्या दुकानांसाठी विक्रीयोग्य वस्तूंची प्रमाणित यादी निश्चित केली आहे. या निर्णयामुळे संबंधित दुकानांमध्ये आता चहा, कॉफी आणि इतर शिजवलेले खाद्यपदार्थ विकता येणार नाहीत.
दुकानांमधील वस्तूंची प्रमाणित यादी
रेल्वेच्या नव्या नियमांनुसार, या दुकानांमध्ये तांदूळ, गहू, पीठ, डाळी, खाद्यतेल, साखर, गूळ, मीठ, मसाले आणि सुकामेवा यांसारख्या जीवनावश्यक वस्तू विकता येणार आहेत. तसेच मान्यताप्राप्त ब्रँडचे पॅकबंद पाणी, फळांचे रस, शीतपेये, बिस्किटे, चिप्स, पॉपकॉर्न आणि इन्स्टंट नूडल्स यांसारखे पॅकबंद खाद्यपदार्थ विक्रीस मुभा देण्यात आली आहे. याशिवाय वैयक्तिक स्वछता आणि दैनंदिन वापरातील साबण, शाम्पू, टिश्यू पेपर, सॅनिटरी नॅपकिन्स आणि स्टेशनरी यांसारख्या वस्तूही उपलब्ध असणार आहेत.
स्वच्छतेचे कडक नियम आणि चहा स्टॉल्सचे वास्तव
विक्रेत्यांना अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांचे काटेकोर पालन करत दुकानाचा परिसर स्वच्छ ठेवावा लागणार आहे. दरम्यान, चहा आणि कॉफी विक्रीवरील हे निर्बंध केवळ दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या दुकानांसाठीच लागू आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर अधिकृतरीत्या चहा-कॉफी विकणाऱ्या स्वतंत्र स्टॉल्सवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.





