
थेट WhatsApp वर मिळवा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यादरम्यान तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या माढा तालुक्यातील तुळशी गावाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०२ नोव्हेंबर : तीव्र पाणीटंचाईमुळे हवालदिल होऊन गाव विकायला काढल्याचे फलक लावणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गावाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठा दिलासा दिला आहे. दुष्काळी पाहणी दौऱ्यात तुळशी गावातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पवार यांनी तात्काळ ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करत, मदतीचा धनादेश खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे सुपूर्त केला आणि तो जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्याच्या सूचना दिल्यात.
दुष्काळाची भीषण परिस्थिती
सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्रता कमालीची वाढली असून अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात १३९ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून केवळ माढा तालुक्यातच ११०० टँकर सुरू आहेत. पाण्याअभावी पिके आणि जळू लागलेल्या फळबागा पाहून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तुळशी गावातील गावकऱ्यांनी पाण्यासाठी आपले गाव विकायला काढल्याचे फलक लावत तीव्र संताप व्यक्त केला होता. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी तुळशी गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
पंतप्रधानांसमोर मांडणार शेतकऱ्यांचे प्रश्न
या पाहणी दौऱ्यादरम्यान बोलताना शरद पवार यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा बारामती दौऱ्यावर येतील, तेव्हा खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे शेतकऱ्यांचे प्रश्न व मागण्या त्यांच्यासमोर मांडतील, असे त्यांनी सांगितले. तसेच सोलापूरचा दौरा पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ते तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.





