प्रवचने – भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दुःखाचे मूळ कारण । स्मरणांतून गेला रघुनंदन ॥

सर्व दुःखाचे मूळ । भगवंतापासून झालो दूर ॥

रामावाचून प्रपंचात नाही सुख । कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख ॥

कोळशाने हात काळा झाला । त्याने दुःखी कष्टी झाला ।

ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला । आपण मात्र नाही ओळखला ।

तैसा प्रपंच दुःखाचा झाला । भगवंतावाचून वाया गेला ॥

जगातील ऐश्वर्य, मानाची प्राप्ति । रामरायाविण समाधान न देती ॥

जे जे वैभव जगती । ते ते आले हाती ॥

वाया सर्व जाते । हाती न येता रघुपति ॥

परमात्म्याचे विस्मरण । हेच बीज जाणावे मूळ कारण ॥

काळजी, चिंता, अहंकार । भिती, तळमळ फार । हा झाला त्याचाच विस्तार ॥

तात्पर्य, कडू बी पेरले । त्याचे गोड फळ नाही आले ॥

काळजी आणि भिती । भगवंताच्या विस्मृतीत जन्मती ॥

म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानि । परमात्म्याला दूरच करतील दोन्ही ॥

व्यवहार, सद्वासना, सदाचरण । लौकिक, संतति, संपत्ति, शास्त्राचे मनन ।

सर्व काही वाटे रामाविण शून्य ॥ संतति, संपत्ति, लौकिकाची प्राप्ति ।

सर्व वैभव जरी आले हाती । तरी रामाविण आहे फजिती ॥

प्रपंची ठेवता दक्षता । न विसंबे रघुनाथा । तोच प्रपंची सुखी जाणा ॥

प्रपंच करावा सर्वांनी जपून । पण रामाचे स्मरण राखून ॥

सर्वस्वी व्हावे भगवंताचे । मी-माझे सोडोनि साचे ॥

भगवंताचे होऊन राहणे । याहून दुजे काही न करणे ॥

‘मी कर्ता नव्हे’ जाणून करी कर्म । त्याला बाधेना कलीचा मार्ग ॥

दुष्ट अभिमानाला न पडावे बळी । त्याचा मालक होईल कलि ॥

कलि जेथे शिरला । त्याने राम दूर केला ॥

भगवंताचे स्मरण सांभाळून । कोणताही करावा व्यवसाय जपून ।

हेच प्रापंचिकास मुख्य साधन ॥

कर्ता मी नव्हे, कर्ता राम । ही मनात जाणूनखूण । करावा व्यवहार जतन ॥

रामापरते हित । मानी त्याचा होई घात ॥

जोवर ‘कर्ता मी’ हे ध्यानी । तोवर मन न लागेल राघवचरणी ॥

मीपण टाकावा, अभिमान सोडावा ।

सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा ॥

ज्याने केले सर्वच रामास अर्पण । तेथे मीपणास नाही ठाव ठिकाण ॥

पापाचे न व्हावे आपण धनी । कर्ता राम जाणून मनी ॥

रामसेवेपरते हित । सत्य सत्य नाही या जगात ॥

म्हणून रामास व्हावे अनन्य शरण । दुःख दूर व्हावयास मुख्य साधन ॥

मनाने होऊन जावे भगवंताचे । त्याने खास केले सार्थक जन्माचे ॥

म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा । ज्याने जोडला रामराणा ॥

ज्याने देह केला रामास अर्पण । धन्य धन्य त्याचे जीवन ॥

अखंड असावे भगवंताचे स्मरण । तो दूर करील दुःखाचे कारण ॥


Back to top button
Don`t copy text!