शासन आपल्या दारी अभियानाचा सातारा पॅटर्न तयार करणार – मंत्री शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२३ । मुंबई । सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे दि.१३ मे रोजी या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. सातारा जिल्ह्यात शासन आपल्या दारी अंतर्गत २७ हजार पात्र लाभार्थ्यांना लाभ झाला असून  या अभियानांतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ होण्यासाठी सातारा पॅटर्न तयार करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

मंत्री श्री. देसाई यांनी आज शासन आपल्या दारी अभियान व जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन या विषयाबाबत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सुलभपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व कोणताही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाला सुरुवात करण्यात झाली आहे. या अभियानाच्या निमित्ताने  जिल्ह्यातील खेडोपाडी व दुर्गम भागात प्रशासन पोहोचले असून शासन आपल्या दारी या अभियानाचा सातारा पॅटर्न तयार करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची उद्या बैठक घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील जलसाठे होणार गाळमुक्त

शेतजमिनींची सुपिकता वाढवून शेतीचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने  गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविली जाते. जलसाठ्यांमधील गाळ काढल्याने जलसाठ्यांची साठवणूक क्षमता वाढेल व काढलेला गाळ शेतजमिनीसाठी वापरल्याने जमिनीचा पोत सुधारेल. धरणे, नदी, नाले आदी पाणी साठविण्याच्या ठिकाणी असलेला गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची कामे 15 जूनपर्यंत करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, जलयुक्त शिवार टप्पा दोन, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनासंदर्भात काल राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या गावांतील कामांची देखभाल, दुरुस्तीची कामे ही या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तातडीने हाती घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या वर्षात जलसाठे शंभर टक्के कसे भरतील याचे नियोजन करण्यात येणार आहे.  जलसाठ्यातील गाळ उपसा करुन शेतकऱ्यांच्या शेतात तसेच गायरान जमीन किंवा पडीक जमिनीत टाकण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीसाठी डिझेल परतावा देण्यात येणार आहे. गावागावात जलयुक्त शिवाराने भूजल पातळीत वाढ करण्यासाठी प्रभावीपणे अभियान राबविण्यात येणार आहे. सर्व पालकमंत्री यांचे आपल्या जिल्ह्यातील कामांवर लक्ष असणार आहे.


Back to top button
Don`t copy text!