प्रवचने – देहबुद्धीचा त्याग करावा


मानाला कारण अभिमान होय. मी मोठा, असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते. हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो. हा अभिमान घालवायला, गुरुआज्ञेत राहणे, त्यांना शरण जाणे, आणि त्यांनी सांगितलेली साधने करणे, हे उपाय आहेत. पण ही साधने निरभिमानाने झाली पाहिजेत. हा अभिमान फार सूक्ष्म असतो. मी गुरुआज्ञेत राहतो, त्यांनी सांगितलेली साधने करतो, आता माझा अभिमान गेला. हे म्हणणे सुद्धा अभिमानाचेच बोलणे होय. खरे पाहता, अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ आहे तरी काय ? शक्ति, की पैसा, की किर्ती ? जगात आपल्यापेक्षा कितीतरी मोठे लोक आहेत. पण मौज अशी की, भिक्षा मागणार्‍यालासुद्धा मोठा अभिमान असतो. “मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो, त्याने मला हट्‌ म्हटले तेव्हापासून त्याचा उंबरठा नाही चढलो मी. ” असे तो म्हणतो. तेव्हा हा अभिमान आणि अपमान, ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण देहबुद्धी. ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे ? मला लोकांनी बरे म्हणावे, मान द्यावा, शिव्या दिल्या तर वाईट वाटते, हे देहबुद्दीला खत घालण्यासारखे आहे. चांगले-वाईट, मान-अपमान सर्व देवाला अर्पण करावे. वस्तुतः कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावे. म्हणजे, त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत. व्यवहारात थोडा अभिमान लागतोच, पण तो केवळ कारणापुरता असावा. वरीष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे. पण तो तितक्यापुरता, त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ही देहबुद्धी, हा अभिमान, जायला सद्‍गुरूचे होऊन राहावे. निदान बळजबरीने तरी ‘मी त्याचा अहे’ असे म्हणावे. सद्‍गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील.

परमार्थांत संतांचे ऐकण्याला महत्त्व आहे. तेथे आईबापांचे का ऐकू नये ? जर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, ज्याचे मन स्थिर झाले आहे, किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशाचेच ऐकण्यात विशेष आहे. आपल्या देहबुद्धीची तर्‍हा मोठी विलक्षण असते. सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही; फार सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही; आणि फुकट काय जेवायला घालायचे, म्हणून तो अन्नदान करीत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा ! देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे. पहाट झाली की थोडा उजेड, थोडा अंधार असतो, त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे; देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित्‌ उजेड आहे. हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला, भगवंताच्या अनुसंधानासारखा कोणता उपाय असणार ?

मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय.


Back to top button
Don`t copy text!