अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही, म्हणजे दुःख होते. अमुक हवे असे वाटूच देऊ नये. परमात्मा ठेवील त्यात समाधान मानावे. याचेच नाव वैराग्य. आपण विषयांत बुडतो आहोत, आणि पुनः विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक नाही का बुडणार ? विषयाची आस धरणे म्हणजे त्याचे दास होण्यासारखे आहे. मनुष्य सुखाकरता धडपड करतो, आणि अंती दुःखमय अशा विषयाची आशा करतो. सुख त्यागात आहे, भोगात नाही, हे पुष्कळांना पटत नाही.
परिसाला लोखंड लागले म्हणजे त्याचे सोने होते, पण रुप्याचे काही सोने होत नाही. तसे आपण दीनाहून दीन म्हणजे अभिमानरहित झाले पाहिजे. आणि असे झाले म्हणजेच परमात्म्याला अनन्य शरण जाता येईल. हे व्हायला त्याची कृपाच पाहिजे, आणि ती नित्य भाकावी. एखाद्या गोष्टीने आपले मन अस्वस्थ होते ते का बरे ? त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून. हा सर्व खेळ आहे, हे मिथ्या आहे, असे जाणून, ज्याप्रमाणे नट नाटकातली आपली भूमिका अगदी खर्यासारखी करतो, त्याप्रमाणे व्यवहार करावा. सुख, समाधान, सत्यात असते, मिथ्यात नसते. आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यात आपल्याला सुख झाले नाही; मग विषय मिथ्या आहेत याची भगवंताने तुम्हाला प्रचीती नाही का दिली ? तरीसुद्धा तुम्ही या विषयांतच प्रपंच कसा सुधारेल असे मला विचारता, याला काय म्हणावे ? जे दुःखमयच आहे त्यात सुख कुठून मिळणार ? दोन लहान मुली भातुकली खेळल्या; जी मुलगी गरीब होती तिने पोळ्या आणि गुळांबा केला, पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंड आणि बासुंदी केली. पहिलीचा गुळांबा जितका पोट भरण्याला उपयोगी नाही, तितकेच दुसरीचे श्रीखंडही उपयोगी नाही. तसे प्रपंचाचे खरेपण आहे. प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुले यांची गरज आहेच असे नाही; जो दुसर्यावर अवलंबून असतो तो प्रपंचीच असतो. म्हणून एकटा असला तरी प्रपंचीच असतो. दुसर्यापासून सुख मिळविण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची होय. पाचजण मिळून प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे ?
प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत, पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचामध्ये कितीही वस्तू आणल्या तरी पुर्या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसर्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की पुनः ती आणायला नको.