प्रवचने – सुखदुःख मनावर अवलंबून आहे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल. दुःखाचे मूळ कुठे आहे हे प्रथम पाहावे. प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते. श्रीमंताच्या किंवा गरीबाच्या सुखदुःखात तसा फरक तो कोणता ? एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे, परंतु मूलबाळ नाही, म्हणून तो दुःखी असतो, तर दुसर्‍याला संतती आहे पण पैसा नाही, म्हणून तो कष्टी होतो. तिसर्‍याला संतती, संपत्ति वगैरे सर्व आहे, परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे. एकंदरीत, सुखदुःखे कोणाला सुटत नाहीत. जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या, तरी पण न्यूनता काही सरत नाही. दुःखावर आपण वरवर उपाय करतो, परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत. खरोखर, सुखदुःख हे वस्तूत नसून आपल्या मनःस्थितीवरच अवलंबून आहे. वस्तू चोरीला गेली त्या वेळी झोपेत, आनंदात होता, पण जागे झाल्यावर, वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला. म्हणजे दुःखी होते ते मन. तेव्हा, औषध द्यायचे ते मनाला द्या. संतांनी मनाला शिकवण दिली. आजवर आम्ही विषयसुख सख्ख्या मुलाप्रमाणे भोगले, आणि परमार्थ सावत्र मुलासारखा केला. सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकविले.

ज्याचा सहवास झाला, त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले. विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो, म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा मानू लागलो. ज्याचे बीज लावावे त्याची फळे खावी. आपण विषयाचे बी पेरतो, आणि विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो, याला काय करावे ? व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे, माझे विषय किती कमी झाले हे आपण पाहावे. जितकी प्रपंचाकरिता तळमळ करतो, तितकी भगवंताकरता करावी. प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे. परमार्थ हा परिस्थितीवर, श्रीमंती-गरीबीवर, रोगी-निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही. मनाची स्वस्थता, अंतःशुद्धता, आचरणाची पवित्रता, यांवर अवलंबून आहे. प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात. आपण रस्त्यातून चाललो असताना, एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय, रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही, आपण आपली आसक्ति त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदुःख देतो, ही आसक्ति काढणे, याचेच नाव परमार्थ होय.

त्याच गोष्टी ‘आसक्ति’ सोडून करणे याचे नाव परमार्थ.


Back to top button
Don`t copy text!