
दैनिक स्थैर्य | दि. ४ मार्च २०२३ | फलटण |
सातारा येथे दि. २ मार्च रोजी स्व. यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा जिल्हास्तरीय स्पर्धा २०२२-२३ संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये मलवडी (ता. फलटण) जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी श्रीकांत संतोष टकले या विद्यार्थ्याने ६०० मीटर धावणे या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून शाळेला गोल्ड मेडल मिळवून दिले आहे.
कबड्डी या सांघिक खेळामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडीच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवून उपविजेता हे स्थान मिळवले व शाळेला ट्रॉफी आणि सन्मानचिन्ह मिळवून दिले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल मलवडी शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थ यांनी विजयी खेळाडूंचे मलवडी गावामधून ढोल-ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढून अभिनंदन केले. यावेळी गावामधील अनेक महिलांनी विजय खेळाडूंना पंचारतीने ओवाळून आशिर्वाद दिले.
शाळा व्यवस्थापन समिती मलवडी व ग्रामस्थ यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांचे शाल व श्रीफळ देऊन मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन करून सत्कार केला. या कार्यक्रमावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.