दैनिक स्थैर्य | दि. ४ मार्च २०२३ | फलटण |
जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी अभिनव उपक्रम सातारा जिल्ह्यात राबवला असून या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील गडांवर गडभ्रमंती व स्वच्छता मोहीम अभियान सुरू केले आहे. हा किल्ले संवर्धनाचा कार्यक्रम असून आत्तापर्यंत सातार्यातील अजिंक्यतारा किल्ला, कोरेगावातील जरंडेश्वर किल्ला , तळबीड येथील वसंतगड किल्ला या किल्ल्यांवर ही मोहीम राबविण्यात आली असून जिल्हा पोलीसप्रमुखांनी राबविलेली ही ‘आपले किल्ले, आपली जबाबदारी, गड भ्रमंती व स्वच्छता मोहीम’ फलटणमध्ये रविवार, दि. ५ मार्च रोजी राबविण्यात येणार आहे.
पोलीसप्रमुख समीर शेख यांचा हा अभिनव उपक्रम फलटण तालुक्यातील ताथवडा येथील संतोषगड या गडावर आयोजित केला असून त्यानुसार गडभ्रमंती व स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व सहभागी लोकांना टी शर्ट व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या मोहिमेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : सकाळी ६.०० ते ६.३० वाजेदरम्यान नावनोंदणी व टी शर्ट वाटप, ६.३० ते ७.०० पोलीस अधिक्षक यांचा स्वागत समारंभ, ७.०० ते ९.०० किल्ले संतोषगड येथे श्रमदान करून परत ९.०० वाजता आलेल्यांना अल्पोपहार व त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी https://forms.gle/fDx2akDBbMmGZ8XQA या लिंकवर क्लिक करावे.
यावेळी फलटण तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांनी आपल्या गावातील सरपंच, उपसरंपच व ग्रामसुरक्षा दलातील जवान तसेच इच्छुक सर्वांना घेऊन उपस्थित रहावे व मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी केले आहे.