शासनाच्या विविध योजनांचा जळगाव जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०५ मार्च २०२२ । जळगाव । राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची चित्ररथ, एलईडी रथाच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती होवून लाभार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले.

शासनाच्या विविध विभागांच्या लोककल्याणकारी योजना जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी फिरता चित्ररथ तसेच एलईडी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. आज या चित्ररथांना पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी जनजागृती व्हावी, याकरीता जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सर्वसाधारण व विशेष घटक योजनेतून या चित्ररथांची निर्मिती केली आहे.

या चित्ररथांचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते फित कापून उद्धघाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, सहाय्यक नियोजन अधिकारी श्री. बावीस्कर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी फिरता चित्ररथ आणि एलईडी ही चांगली संकल्पना आहे. चित्ररथ व एलईडीच्या माध्यमातून योजनांची माहिती अधिक सुलभपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी चित्ररथ व एलईडी चित्ररथाची संकल्पना सांगितली.

या चित्ररथावर शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविल्या जात असलेल्या जलजीवन मिशन, हर घर जल, ई-पीक पाहणी, प्रधानमंत्री पिक विमा योजना, महाराजस्व अभियान, हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग, आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, महाराष्ट्र राज्यगीत, मुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय निधी, माझी कन्या भाग्यश्री, सुहिता तुमच्यासाठी, महाआवास योजना, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना एसटी मध्ये मोफत प्रवास आदिंसह सामाजिक न्याय विभागाच्या रमाई आवास योजना (घरकुल), गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल, मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहे, भारत सरकार शिष्यवृत्ती, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन, सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांसाठी सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आदी योजनांची माहिती या फिरता चित्ररथ तसेच एलईडी चित्ररथाद्वारे व जिंगल्सद्वारे ग्रामीण भागात पोहोचवली जात आहे. हे चित्ररथ जळगाव जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील अधिकाधिक लोकवस्ती असलेल्या प्रमुख व बाजारपेठेच्या गावांमध्ये जाणार आहे.

यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेल्या घडीपुस्तिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयातर्फे चित्ररथ, एलईडीबरोबरच कलापथके, आकाशवाणी, एफएम रेडिओवर ऑडियो जिंगल्स, व्हिडीओच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!