कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्वयंशिस्त महत्वाची; घरीच रहा व शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करा; श्रीमंत संजीवराजेंचे आवाहन


स्थैर्य, फलटण, दि. १७ : सध्या सातारा जिल्ह्यासह फलटणमध्ये कोरोनचे रुग्ण हे मोठ्या संख्येने सापडत आहेत. कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यासह फलटणमध्ये आली असल्याची अंदाज सध्या व्यक्त होत आहेत. कोरोनाची पहिली लाट आली होती त्या वेळी शासनाने कडक लॉकडाऊन केले व त्या मुळे कोरोनच्या पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यामध्ये आपल्या सर्वांना यश आलेले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर यश मिळवण्यासाठी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. तरी फलटणकरांनी घरीच राहून शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.

सध्याच्या कोरोनाच्या लाटेमध्ये पहिल्या लाटेपेक्षा अधिक रुग्ण गंभीर होताना दिसत आहेत. याला सामोरे जाण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित होऊन लढणे गरजेचे आहे. सध्या फलटणमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. रेमडीसीव्हर ह्या इंजेक्शनचा तुटवडा सुद्धा सध्या जाणवत आहे. आज सरकारी असो अथवा खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा सहजासहजी बेड्स उपलब्ध होत नाहीत. सातारा जिल्हा जम्बो हॉस्पिटलमध्ये सुद्धा बेड्स मिळत नाहीत. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण शासनाच्या नियमांच्या पुढे जाऊन काळजी घेणे गरजेचे आहे, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केलेले आहे.

शहरातील मोठ्या प्रमाणात रुग्ण सध्या गृह विलगिकरणात राहून उपचार घेत आहेत. मात्र, काही महाभाग बाधित असतानाही बिनदिक्कत बाहेर फिरत असतात. त्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची भीती आहे. फलटण तालुक्यामध्ये आजअखेर जवळपास दहा हजार व्यक्ती ह्या कोरोनाबाधित झालेल्या आहेत. कोरोनावर जर आपल्याला यश मिळवायचे असेल आपल्या सर्वांना सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. कोरोनावर जर आळा घालायचा असेल तर वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करणे व बाहेर पडताना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. ह्या मध्ये जर गरज नसेल तर घरातून बाहेर नागरिकांनी पडूच नये आणि जर पडायचे झालेच तर सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करावे असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!