सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू


स्थैर्य, सोलापूर, दि.३१: सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 2 एप्रिल ते 16 एप्रिल 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) आणि 37 (3) आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भारत वाघमारे यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार शस्त्रे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल, सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच पाच किंवा पाचहून अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे.

हा आदेश अत्यावश्यक सेवा, तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधीक्षक (ग्रा.), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत.


Back to top button
Don`t copy text!