विज्ञानाने सामान्यांच्या निकडीच्या गरजांवर संशोधन करणे आवश्यक – उपराष्ट्रपती


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२६: भारत आता आपल्या देशात निर्माण झालेली स्वदेशी कोविड लस आणण्याच्या तयारीत असल्याबद्दल उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी आनंद व्यक्त केला. ही गोष्ट प्रत्यक्षात आणणाऱ्या मेहनती शास्त्रज्ञांचीही त्यांनी प्रशंसा केली.

भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान सोहळ्याच्या  समारोपाच्या सत्राला हैदराबाद येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना नायडू यांनी भारतातला स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने पीपीई व कोविड निदान चाचणी संच निर्मितीत भारतीय शास्त्रज्ञांनी दाखवलेल्या समर्पित वृत्तीची प्रशंसा केली.

कोरोनो विषाणूची वर्तणूक, औषधोपचार आणि लस याबाबतीत लोकांमध्ये पसरलेली भिती व चिंतेचा उल्लेख करून नायडू यांनी या ‘इन्फोडेमिक’ने आपल्या जीवनातील वैज्ञानिक दृष्टीकोनाचे महत्व अधोरेखित केल्याचे सांगितले.

विज्ञान क्षेत्रातील भारताच्या संपन्न परंपरेचा उल्लेख करून नायडू यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातही भारतीय तत्वज्ञानाची केंद्रीय कल्पना “शेअर अँड केअर”  व वसुधैव कुटुंबकम हीच कायम राहिल्याचे प्रतिपादन केले. प्रख्यात शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी अनेक शोध आणि संशोधने करूनही एकही पेटंट घेतले नसल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

विज्ञान क्षेत्रातील आपल्या संपन्न परंपरेबद्दल बरेच भारतीयच अनभिज्ञ असल्याबद्दल खेद व्यक्त करत त्यांनी आपले वैज्ञानिक यश साजरे करण्याचे आवाहन केले. मुलांना विज्ञानात कारकिर्द घडवण्यास प्रोत्साहन देउन भारताला वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील नेतृत्वपदी नेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

विज्ञानविषयक शिक्षणाचा पुरस्कार आणि लहान वयातच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे याची गरज असल्याचे सांगून पालकांना व शिक्षकांना त्यांनी, “ मुलांना उत्तरे देण्यास भाग पाडू नका त्याऐवजी प्रश्न विचारण्यास त्यांना प्रोत्साहित करा”, असे आवाहन केले.

घोकंपट्टीचा शेवट झाल्याचे सांगत त्यांनी, विद्यार्थ्यांना सांगण्यापेक्षा शोध घेण्यास प्रवृत्त करावे असे सांगितले.

या प्रसंगी नायडू यांनी विज्ञान शिक्षणात समग्र व आंतरशाखीय दृष्टीकोन जोपासण्याचे आवाहन केले.

विज्ञान व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन जोपासण्याच्या उद्देशाने होत असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान सोहोळ्याची प्रशंसा करत त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे होत असलेल्या या सोहळ्याचे उत्तम आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

या वर्षीच्या विज्ञान सोहळ्याची कल्पना ही “स्वनिर्भर भारत आणि विश्वकल्याणासाठी विज्ञान ही होती व हा CSIR व विज्ञान भारतीच्या तसेच अन्य मंत्रालय विभागांच्या सहयोगाने साजरा झाला.


Back to top button
Don`t copy text!