रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नोकर भरतीत घोटाळा


 

स्थैर्य, सातारा, दि.१८: रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नोकर भरतीत घोटाळा झाला आहे. याबाबत तक्रारी झाल्यानंतर संस्थेचे माजी सचिव भाऊसाहेब कराळे आणि अरविंद बुरुंगले यांचे राजीनामे संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आले. 

रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीसाठी पैसे घेतले जातात अशा तक्रारी यापूर्वीही अनेकदा झाल्या आहेत. मात्र, या संस्थेचे पदाधिकारी कोणाकडूनही पैसे घेत नाहीत असा दावा संस्थेकडून केला जात होता. त्यांचा हा दावा किती खोटा होता हे आता समोर आले आहे. रयत मध्ये देखील नोकरीसाठी पैसे घेतले जातात अशी तक्रार काही सदस्यांनी केली होती. अनेक संस्थांच्या प्राचार्यांकडेही याबाबत तक्रारी आल्या होत्या, पैसे दिले नाहीत म्हणून अनेकांना पंधरा पंधरा वर्ष नोकरीत कायम करण्यात आले नव्हते. मात्र, ज्यांनी पैसे दिले त्यांच्या ताबडतोब ऑर्डर काढण्यात आल्या. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनेक जणांना केवळ तासिका तत्त्वावर काम करावे लागत होते. संस्थेमध्ये सचिव पदावर काम केलेले भाऊसाहेब कराळे आणि अरविंद बुरुंगले यांच्याबाबतही तक्रारी झाल्या होत्या याबाबतची चौकशी केल्यानंतर ते दोषी आढळले. त्यामुळे या दोघांकडूनही राजीनामे घेण्यात आले आहेत. 

राज्यपाल कोश्यारी यांच्याकडेही नोकर भरतीसाठी पैसे घेतले जातात अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारीची गंभीर दखल घेत याबाबत गृहविभागाने लक्ष घालावे असे आदेश देण्यात आले होते. मात्र, सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आणि या संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार असल्यामुळे दोन माजी सचिवांचे राजीनामे घेऊन हे प्रकरण याच ठिकाणी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अशा प्रकारे किती जणांची फसवणूक झाली, किती जणांना नोकऱ्या मिळाल्या. किती जणांना नोकरी वाचून वंचित राहावे लागले हा प्रश्नही अनुत्तरितच राहिलेला आहे. याबाबत संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी  बोलण्यास नकार दिला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!