

ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेल्या धुळदेव (ता. फलटण) येथील सायली विशाल शिंदे यांची महाराष्ट्र पोलीस दलात (रत्नागिरी) निवड झाली आहे. त्यांच्या या प्रेरणादायी यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 17 मे : ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेल्या धुळदेव (ता. फलटण) गावची सुकन्या सौ. सायली विशाल शिंदे यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली असून, त्यांची रत्नागिरी येथे नियुक्ती जाहीर झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे धुळदेव गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, समाजाच्या सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होत आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश:
सायली शिंदे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत हे यश मिळवले आहे. कै. ज्योतीराम माणिकराव शिंदे यांचे आशीर्वाद आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते असलेले त्यांचे पती विशाल ज्योतीराम शिंदे यांच्या भक्कम पाठबळामुळे त्यांनी हा टप्पा गाठला. प्रचंड संघर्ष, अथक मेहनत आणि अंगी असलेल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
मान्यवरांकडून निवासस्थानी भेट देऊन सत्कार:
सायली शिंदे यांच्या या यशाची दखल घेत परिसरातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये फलटण पंचायत समितीचे सदस्य तथा अध्यक्ष सचिनराव अभंग, धुळदेव गावचे माजी सरपंच चंद्रकांत जाधव, सुभाषराव शिंदे, विडणीचे माजी सरपंच शरदराव कोल्हे, धुळदेव विकास सोसायटीचे माजी चेअरमन बापूराव नाळे, ग्रामपंचायत सदस्य श्री. महामुनी, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत पवार, रवीभाऊ मदने, सौरभ आदलिंगे यांच्यासह अनेक ग्रामस्थ, पदाधिकारी व महिला भगिनींनी उपस्थित राहून सायली यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सौ. सायली शिंदे यांचे हे यश निश्चितच धुळदेव गावासाठी अत्यंत अभिमानास्पद असून, ग्रामीण भागातील आणि विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी ते नक्कीच एक मोठे प्रेरणास्थान ठरणार आहे.
