
थेट WhatsApp वर मिळवा
सातारा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत हयातीचे दाखले सादर करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी आरती नांगरे यांनी केले आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ३१ ऑक्टोबर : माहे डिसेंबरचे निवृत्तीवेतन वेळेत जमा होण्यासाठी कोषागार कार्यालय, सातारा मार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबर २०२६ अखेर हयातीचे दाखले सादर करण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन सातारा जिल्हा कोषागार अधिकारी आरती नांगरे यांनी केले आहे.
बँका आणि ऑनलाईन माध्यमातून दाखले सादर करण्याची सुविधा
सातारा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी हयात असल्याबाबतचा दाखला ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत आहेत, त्या बँकेत जाऊन ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीच्या दाखल्यांच्या नोंदवहीमध्ये आपल्याच नावासमोर खात्री करून स्वाक्षरी किंवा अंगठा करणे आवश्यक आहे. यासाठी हयातीच्या दाखल्यांची नमुना नोंदवही या कोषागारामार्फत सर्व बँकांकडे पुरवण्यात येणार आहे. मनीऑर्डरद्वारे निवृत्तीवेतन घेणाऱ्यांना या कार्यालयामार्फत दाखले देण्यात येतील. तसेच परदेशात राहत असलेल्यांनी विहित मार्गाने जिल्हा कोषागार कार्यालयास हयातीचे दाखले प्राप्त होतील याची दक्षता घ्यावी. याशिवाय, डिजिटल पद्धतीने ‘जीवन प्रमाणपत्र’ सादर करण्यासाठी [https://jeevanpramaan.gov.in](https://jeevanpramaan.gov.in) या लिंकवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महिला निवृत्तीवेतनधारकांसाठी विशेष सूचना
वित्त विभागाच्या ७ जानेवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दहा नुसार, ज्या महिलांना निवृत्तीवेतन मंजूर झाले आहे, अशांनी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला व पुनर्विवाह न केल्याबाबतचे व उपजीविकेची सुरुवात न केल्याबाबतचे स्वयंप्रतिज्ञापत्र प्रतिमाह या कार्यालयास सादर करावे. ज्यांचे दाखले ३० नोव्हेंबरअखेर सातारा कोषागार कार्यालयात प्राप्त होणार नाहीत, त्यांचे माहे डिसेंबर २०२५ चे निवृत्तीवेतन संगणक प्रणालीद्वारे आपोआप थांबविले जाणार असल्याची नोंद सर्व निवृत्तीवेतनधारकांनी घ्यावी, असेही नांगरे यांनी कळविले आहे.





