पाडेगावमधील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात चोरी; १ लाख १५ हजारांचा ऐंशी लंपास

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून सुमारे १ लाख १५ हजार १०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ३१ मार्च : फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात सोमवारी रात्री साडेनऊ ते मंगळवारी पहाटे पाच या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत चांदीचा मुखवटा, त्रिशूळ, पादुका आणि दानपेटी लांबवली. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मंदिरातून साहित्याची चोरी

मंदिरातील चोरी प्रकरणाची माहिती मिळताच पुजारी रविकिरण शिंदे यांनी मंदिरात जाऊन पाहणी केली. चोरट्यांनी सुमारे ७५ हजार रुपये किमतीचा फेट्याच्या नक्षीचा व लाल खडा असलेला चांदीचा मुखवटा, नक्षीकाम केलेला सुमारे एक किलो वजनाचा चांदीचा त्रिशूळ चोरला. तसेच ४० हजार रुपये किमतीच्या सुमारे ५०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका आणि १०० रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची लाकडी दानपेटी असा एकूण १ लाख १५ हजार १०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुखवटा, त्रिशूळ आणि पादुका सुमारे १५ वर्षांपूर्वी मंदिराला दान करण्यात आल्या होत्या. ग्रामदैवताच्या मंदिरातच चोरी झाल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत असून ग्रामीण भागातील मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये मंदिराचे पुजारी रविकिरण शिंदे यांनी फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!