
थेट WhatsApp वर मिळवा
पावसाने ओढ दिल्याने माण तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटैंचाईमुळे ३८ गावे व २२४ वाड्यांवरील ५१ हजार नागरिकांना प्रशासनाच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
स्थैर्य, दहिवडी, दि. ३१ ऑक्टोबर : पावसाने परतीची पाठ फिरवल्यामुळे माण तालुक्यात अत्यंत बिकट अवस्था निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ऑक्टोबर महिना संपताना तालुक्यातील ३८ गावे आणि २२४ वाड्या-वस्त्यांवरील ५१ हजार ७९६ नागरिकांना, तसेच ४१ हजार १४१ पशुधनाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनावर अवलंबून राहावे लागत आहे.
सध्या प्रशासनाकडून १ शासकीय आणि ३२ खासगी अशा एकूण ३३ टँकरद्वारे दररोज ७० खेपा पाणीपुरवठा केला जात आहे. दहिवडी, शिंगणापूर, म्हसवड, गोंदवले बुद्रुक, मार्डी, वरकुटे मलवडी, मलवडी, आंधळी आणि कुकुडवाड मंडलातील अनेक गावांना या टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी १० विहिरी व ६ बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
पाण्याविना कोरडेठाक तलाव
तालुक्यातील जवळपास दहा महत्त्वाचे पाणी साठवण तलाव कोरडे पडले असून अनेक तलावांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक आहे. आंधळी धरणाचा उजवा कालवा अपूर्ण असल्यामुळे व पाणी मिळत नसल्यामुळे लाभधारक जमिनी पाण्याविना पडीक राहिल्या आहेत. येत्या काळात पाऊस न झाल्यास पाण्याचे संकट अधिक गडद होणार असून शाश्वत सिंचन योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.





