साताऱ्यात ३.४१ लाख मतदारांचे गणना प्रपत्र अप्राप्त; प्रारूप यादीत नाव तपासण्याचे आवाहन

SIR मोहिमेत सातारा जिल्ह्यातील २६.५१ लाख मतदारांपैकी ३.४१ लाख मतदारांचे गणना प्रपत्र मिळालेले नाही. नागरिकांना प्रारूप मतदार यादी तपासण्याचे आवाहन करण्यात आले.

स्थैर्य, सातारा, दि. ३१ ऑगस्ट : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २६ लाख ५१ हजार ३४७ मतदारांपैकी ३ लाख ४१ हजार ९२५ मतदारांचे गणना प्रपत्र प्राप्त झालेले नसून, त्यांची ‘Uncollectable EF’ प्रवर्गात नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव आणि इतर तपशील तपासून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

२३ लाखांहून अधिक मतदारांचे प्रपत्र प्राप्त

SIR मोहिमेत मतदारांच्या घरोघरी जाऊन गणना प्रपत्र देणे, ते भरून घेणे आणि मतदार नोंदींची पडताळणी करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. जिल्ह्यातील २३ लाख ९ हजार ४२२ म्हणजेच ८७.१० टक्के मतदारांचे भरलेले आणि स्वाक्षरी केलेले गणना प्रपत्र प्राप्त झाले आहे. उर्वरित ३ लाख ४१ हजार ९२५ म्हणजे १२.९० टक्के मतदारांचे प्रपत्र गृहभेटीनंतरही प्राप्त झालेले नाही.

‘Uncollectable EF’ प्रवर्गातील १ लाख ९१ हजार ३८३ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याची नोंद आहे. याशिवाय ८८ हजार ४९० मृत मतदार, ३४ हजार ९०५ अन्यत्र नोंदणी झालेले अथवा दुबार नोंद असलेले मतदार आणि २६ हजार ३२६ सापडू न शकलेले किंवा गृहभेटीवेळी गैरहजर असलेले मतदार आहेत. अन्य कारणांमुळे ८२१ मतदारांचा ‘इतर’ प्रवर्गात समावेश आहे.

नोंद झाली म्हणजे नाव वगळले असे नाही

‘Uncollectable EF’ प्रवर्गात नोंद झाल्याचा अर्थ संबंधित मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आले आहे, असा नाही. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना दावा, हरकत आणि दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे.

प्रशासनाने सापडू न शकलेले किंवा गैरहजर, कायमस्वरूपी स्थलांतरित, मृत आणि अन्यत्र नोंदणी झालेले अथवा दुबार नोंद असलेल्या ASDD मतदारांच्या याद्याही उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रारूप मतदार यादी संबंधित संकेतस्थळांसह तहसील कार्यालय, मतदार नोंदणी कार्यालय आणि संबंधित BLO यांच्याकडे उपलब्ध आहे.

३० सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती

प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास प्रपत्र क्रमांक ६ भरून मतदार नोंदणी करता येणार आहे. एखाद्या नावाबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी प्रपत्र क्रमांक ७, तर नाव, पत्ता किंवा अन्य तपशिलातील दुरुस्तीसाठी प्रपत्र क्रमांक ८ भरता येईल.

दावे आणि हरकती ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दाखल करता येणार आहेत. प्रपत्र क्रमांक ६, ७ आणि ८ ऑनलाइन भरण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या Voters’ Service Portal चा वापर करता येईल.

मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे, तर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करण्याची तरतूद आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत नाव, पत्ता आणि अन्य तपशील तपासून त्रुटी असल्यास निर्धारित मुदतीत आवश्यक अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Back to top button
Don`t copy text!