

सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, भाजपचे धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १ जून : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अंतिम दिवस आहे. भारतीय जनता पार्टीकडून (महायुती) धैर्यशील कदम यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार असल्याचे चित्र आता निश्चित झाले आहे.
फलटणच्या “राजे” गटाची भूमिका काय राहणार?
या निवडणुकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ‘राजे’ गटाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राजकीयदृष्ट्या ‘राजे’ गट महायुतीसोबत असला तरी, माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि श्रीमंत रामराजे यांचे मैत्रीपूर्ण व जिव्हाळ्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राजे गट नक्की कोणाच्या पाठीशी उभा राहणार, पक्षादेश पाळणार की मैत्री निभावणार, हा चर्चेचा विषय बनला आहे.
शिवसेनेच्या झेंड्यावरील सदस्यांची कसोटी
स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी प्रामुख्याने नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती हे मतदार असतात. फलटण तालुक्यात शिवसेनेच्या झेंड्यावर निवडून आलेले राजे गटाचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यही आहेत. या अटीतटीच्या लढतीत या सदस्यांची भूमिका काय राहणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
मागील निवडणुकीतील धक्कादायक निकालाचा संदर्भ
या मतदारसंघातील मागील निवडणुकीचा इतिहास पाहता, त्यावेळी राजे गट अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबत होता. त्यावेळी राष्ट्रवादीकडून शेखर गोरे यांना तर काँग्रेसकडून माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांना अनपेक्षितपणे पराभवाचा धक्का बसला होता आणि काँग्रेसचे मोहनराव कदम विजयी झाले होते. मागील निवडणुकीतील या निकालाच्या पार्श्वभूमीवर, आताच्या या हाय-व्होल्टेज निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि विजयाचे पारडे कुणाच्या बाजूने झुकणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
