
स्थैर्य, सातारा दि 12 : कोरोनाचे थैमान, बाधितांची वाढती संख्या, उपचारासाठी बेडची कमतरता अशा संकटाला तोंड देत असतानाच जिल्ह्यापुढे आणखी एक संकट आले आहे. जिल्ह्यात 8,327 रुग्ण उपचार घेत असतानाच येत्या 16 सप्टेंबरपासून रुग्णालयांना एकमेव वितरकाकडून होत असलेला ऑक्सिजन पुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे आता अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते. जिल्हा प्रशासनाने वेळीच योग्य कार्यवाही करून ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ देऊ नये, अन्यथा बाधितांच्या रुग्णांच्या जीवावरचे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
राज्यात ऑक्सिजन तुटवड्या विषयी मोठ्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. अनेक ठिकाणी ऑक्सिजन पुरवठादारांना तो उपलब्ध होत नसल्याने गांभीर्य वाढले आहे. सातार्यातील रवीवैभव हा एकमेव ऑक्सिजन पुरवठादार असून त्यांच्याकडून जिल्हा रुग्णालयास सर्व खाजगी रुग्णालयांना तेच ऑक्सिजन पोच करतात. मागणी वाढली असली तरी पुरवठादाराला संबंधित एजन्सीकडून पुरेसा पुरवठा होत नाही. मनुष्यबळ कमी होऊ लागले असून ऑक्सिजनसाठी सतत दबाव आणला जात आहे. यामुळे त्रस्त झालेल्या एकमेव पुरवठादार रवीवैभव एजन्सीने सर्व ग्राहकांना दि.16 पासून ऑक्सिजन पुरवठा करणार नसून अन्य पर्यायी व्यवस्था करण्याबाबतीत लेखी पत्र दिली आहेत.
याबाबत रवीवैभव एजन्सीकडून जिल्हा प्रशासनाला वारंवार गंभीर परिस्थितीची माहिती देऊन ही योग्य उपाययोजना होत नसल्याचे सर्व ग्राहकांना सांगितलेचे समजले. रुग्णालयात उपचारासाठी बेड नसल्याने जिल्ह्यात मिशन ऑक्सिजन चळवळ सुरू झाली आहे. रुग्णांना घरीच ऑक्सिजन मशीन लावली जात आहेत. विद्युत पुरवठा बंद झाल्यास मात्र, ही मशीन बंद होतात. अधिक गरजू रुग्णांना रुग्णालयात ऑक्सिजन शिवाय म्हणजे आयुष्याचा दोर कमकुवत होणार असून जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला नाही तर रुग्णांच्या जीवावरचे संकट येऊ शकते. तरीही जिल्हा प्रशासनाने तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणावर कृत्रिम प्राण वायु पुरवठा करावा लागत आहे. त्यात कोणताही खंड पढू दिला जाणार नाही असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.
सध्या समाज माध्यमातून सातारा जिल्ह्याला कृत्रिम प्राण वायुचा पुरवठा बंद केला जाईल असे एका पत्राचा हवाला देऊन बातम्या दिल्या जात आहेत. ती प्रशासकीय तांत्रिक बाब असून त्यातून प्रशासनाने मार्ग काढला असून पूर्वी सारखाच पुरवठा सुरु राहिल असे जिल्हाधिकाऱ्यानी सांगितले आहे, त्यामुळे चिंता करू नये. जनते मध्ये संभ्रम निर्माण होईल असे वृत्त पसरवू नये असे आवाहन ही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.