सातारा-लोणंद मार्गावर अवजड वाहतुकीला बंदी; वाढे अन् वडूथ पुलांवरून असा होणार बदल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

सातारा-लोणंद मार्गावरील वाढे व वडूथ पुलांच्या खालावलेल्या स्थितीमुळे २८ सप्टेंबरपासून अवजड वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २३ सप्टेंबर : सातारा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीवरील वाढे आणि वडूथ गावाजवळील वेण्णा व कृष्णा नदीवरील ऐतिहासिक दगडी कमानीच्या पुलांची पावसाळ्यामुळे संरचनात्मक स्थिती खालावली आहे. पुलांवर पाणी पाझरणे, तडे जाणे आणि कमानीची झीज झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून या पुलांवरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सातारा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

वाहतुकीतील बदल आणि पर्यायी मार्ग

अधिसूचनेनुसार २८ सप्टेंबर मध्यरात्री १२:०१ वाजेपासून ते २० जून २०२७ रात्री ११:५९ वाजेपर्यंत हा वाहतूक बदल लागू राहील. लोणंदकडून साताऱ्याकडे येणारी आणि साताऱ्याकडून लोणंद किंवा फलटणकडे जाणारी सर्व अवजड वाहने वाढे फाट्यावरून न जाता पुणे-बंगळुरू महामार्गावरून खंडाळा व शिरवळमार्गे धावतील. साताऱ्याकडून फलटणकडे जाणारी वाहतूक बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून कोरेगाव, पुसेगाव आणि ताथवडे घाटमार्गे वळवण्यात आली आहे. तसेच आदर्कीमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी पिंपोडे बु., सर्कलवाडी व शिरगाव घाट असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

एसटी आणि स्कूल बसला सूट

वाढे आणि वडूथ येथील दोन्ही पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आले असले तरी प्रवाशांची सोय लक्षात घेऊन एसटी बस आणि स्कूल बसना या पुलांवरून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय हलक्या वाहनांच्या वाहतुकीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वाहनचालकांनी रस्ते आणि चौकात लावलेल्या दिशादर्शक फलकांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!