‘हॉट’ साताऱ्याचा पारा ४१.२ अंशांवर; माण, खटावमध्ये तापमान ४३ अंशांच्या घरात, उष्माघाताने एका शेतकऱ्याचा मृत्यू


सातारा जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून साताऱ्याचा पारा ४१.२ अंश तर माण-खटावमध्ये ४३ अंशांवर गेला आहे. माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील एका ७० वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १७ एप्रिल : सातारा जिल्ह्यात यंदा उष्णतेची मोठी लाट आली असून, मागील पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांशी भागाचा पारा ४० अंशांवर कायम आहे. सातारा शहरातील कमाल तापमानानेही ४१ अंशांचा टप्पा पार केला असून, ४१.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. हे मागील दोन वर्षांतील सर्वात उच्चांकी तापमान ठरले आहे. दुसरीकडे, दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यातील पारा थेट ४३ अंशांच्या घरात गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच, माण तालुक्यात गुरुवारी एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

माण तालुक्यात उष्माघाताने बळी?

माण तालुक्यातील पारा ४३ अंशांपर्यंत गेल्याने याचा मोठा परिणाम जनजीवनावर झाला आहे. कडक ऊन असतानाही अनेक शेतकरी दुपारी शेतात काम करतात आणि उन्हातच आपल्या पशुधनाची राखण करतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशातच माण तालुक्यातील ‘वरकुटे मलवडी’ येथील शेतकरी हनुमंत काशीनाथ चव्हाण (वय ७०) यांचा उष्माघाताने बळी गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हनुमंत चव्हाण हे सकाळी शेतात शेळ्या राखण्यासाठी गेले होते. वाढत्या उन्हामुळे त्यांना अचानक थकवा जाणवू लागल्याने ते एका झाडाखाली बसले. पण, थोड्याच वेळात चक्कर येऊन ते जमिनीवर पडले. नातेवाइकांनी त्यांना बेशुद्धावस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

एप्रिल महिना ठरला सर्वांत ‘हॉट’

सातारा जिल्ह्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढली होती. मार्च महिन्यातही कमाल तापमान ३८ अंशांवर गेले होते. मात्र, यंदाचा एप्रिल महिना मागील काही वर्षांतील सर्वांत कडक उन्हाळ्याचा महिना ठरत आहे. कारण, एप्रिलच्या मध्यावरच पारा ४० अंशांवर पोहोचला असून, दररोजच कमाल तापमानात वाढ होत चालली आहे.

साधारणतः सातारा शहराचे तापमान एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ४१ अंशांपर्यंत जाते. पण, यंदा एप्रिलच एकदम ‘हॉट’ ठरला आहे. १२ एप्रिलपासून साताऱ्यात ४० अंशांवर कमाल तापमान आहे. ४१.२ अंशाची नोंद झाल्याने उष्णतेची ही लाट आणखी तीव्र होताना दिसून येत आहे. नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!