अन्न सुरक्षेचा बडगा; दुधासाठी प्लॅस्टिक कॅन बंदी अन् शाळांजवळ हानिकारक पदार्थांच्या विक्रीवर रोख

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा जिल्ह्यात अन्न सुरक्षा कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू असून, दूध वाहतूकसाठी प्लॅस्टिक कॅन बंदीसह हॉटेलमधील खाद्यरंग आणि शाळा परिसरातील अयोग्य अन्नविक्रीवर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १५ ऑक्टोबर : अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार ग्राहकांना स्वच्छ व निर्भेळ अन्नपदार्थ मिळावेत यासाठी सातारा जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक संस्था, संकलन केंद्रे आणि वाहतूकदारांना दुधासाठी प्लॅस्टिक कॅनऐवजी स्टेनलेस स्टीलच्या कॅनचाच वापर करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. प्लॅस्टिकच्या वारंवार वापराने दुधात अंश मिसळण्याचा धोका असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये निर्बंध

जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट तसेच चायनीज, बिर्याणी विक्रेत्यांनी अन्नामध्ये कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम खाद्यरंगांचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. खाद्यरंग केवळ स्वीट व बेकरीजन्य पदार्थांतच ठराविक मर्यादेत वापरण्यास परवानगी आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

शाळा परिसरातील अन्नविक्रीवर कडक नजर

लहान मुलांच्या आरोग्यारक्षणार्थ शाळांच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात साखर, मीठ व तेलाचे प्रमाण जास्त असलेल्या अस्वास्थ्यकर खाद्यपदार्थांच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाची पथके यावर सातत्याने लक्ष ठेवून असून नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!