
सातारा जिल्ह्यातील माण, वाई आणि पाटण तालुक्यांत पाणीटंचाई गंभीर बनली असून, १७ गावे आणि १०० वाड्यांना १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागात आठवड्यातून दोनदाच पाणीपुरवठा सुरू आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १५ एप्रिल : जिल्ह्याच्या बहुतांश भागात भूजल पातळीत वेगाने घट होत असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. सद्यःस्थितीत माण, वाई आणि पाटण तालुक्यांत टंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, जिल्ह्यातील १७ गावे आणि १०० वाड्यांना १६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गावोगावी विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने प्रशासनाकडून पाणी बचतीचे कठोर नियोजन केले जात आहे.
भूजल पातळीत घट अन् नळपाणी पुरवठ्यात कपात
जिल्ह्यात अनेक ठिकाणी विहिरी आणि बोअरवेलचे पाणी कमी झाले आहे. जलस्रोतांची पाणीपातळी झपाट्याने खालावल्याने गावोगावी नळांद्वारे होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. भविष्यातील तीव्र टंचाईचे संकट ओळखून ग्रामपंचायतींच्या वतीने उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याबाबत नियोजन होत असून, बहुतांश ग्रामीण भागात सध्या आठवड्यातून केवळ दोनदाच नळांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
तालुकानिहाय टंचाईची सद्यस्थिती :
-
माण तालुका : सर्वाधिक टंचाई माण तालुक्यात असून १३ गावे व ९० वाड्यांमध्ये शासकीय ४ व खासगी ४ अशा एकूण ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर तालुक्यातील १६,२५८ लोकसंख्या अवलंबून आहे.
-
वाई तालुका : ४ गावे आणि ३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या पाण्यावर ३,६५९ लोकसंख्या व १,४९५ पशुधन पूर्णपणे अवलंबून आहे.
-
पाटण तालुका : ५ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होत असून, १,०७५ लोकसंख्या व ७९० पशुधन या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे.
पाणीटंचाईच्या या वाढत्या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. सद्यस्थितीत टँकर भरण्यासाठी प्रशासनाकडून ४ विहिरी आणि ५ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाचे अधिकारी श्री. चक्के यांनी दिली आहे.
