सातारा जिल्हा बँकेत रणजितदादांच्या ‘मास्टरस्ट्रोक’ने कॅबिनेट मंत्र्यांचे ‘बिनविरोध’चे दरवाजे बंद

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा जिल्हा बँकेत उच्च न्यायालयाच्या निकालाने नवा पेच निर्माण झाला असून रणजितसिंह निंबाळकरांच्या रणनीतीमुळे मंत्री मकरंद पाटलांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १४ ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या संपूर्ण जिल्ह्यात शिगेला पोहोचली आहे. अशातच, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण निकालामुळे या निवडणुकीत एक मोठा आणि अनपेक्षित ट्विस्ट निर्माण झाला आहे. सलग दहा वर्षे संचालक पद भूषवलेल्या नेत्यांना आता पुन्हा जिल्हा बँकेत संचालक म्हणून काम पाहता येणार नाही, असा स्पष्ट निकाल न्यायालयाने दिला आहे. या कायदेशीर पेचासोबतच, माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अचूक राजकीय रणनीतीमुळे राज्याचे कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांच्या बिनविरोध निवडून येण्याच्या मनसुब्यांवर पूर्णपणे पाणी फेरले गेले आहे.

राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेल्या मकरंद पाटील यांनी सातारा जिल्हा बँकेच्या ‘कृषी पणन संस्था, शेतीमाल प्रक्रिया संस्था व खरेदी-विक्री संघ’ या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघातून त्यांच्या विरोधात सुरुवातीला कोणताही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात होती. मंत्री महोदयांनी तशी संपूर्ण तयारीही केली होती. मात्र, राजकारणातील अचूक ‘टायमिंग’ साधत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अर्ज दाखल करण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी एक मोठा राजकीय डाव टाकला. रणजितदादांनी ज्येष्ठ नेते विश्वास (बापू) निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने अधिकृत उमेदवारी देत जोरदार शक्तिप्रदर्शनासह त्यांचा अर्ज दाखल केला. विश्वास बापूंचा अर्ज रोखण्यासाठी मंत्री मकरंद पाटील यांनी अनेक प्रयत्न केले, परंतु रणजितदादांच्या राजकीय वजनामुळे हा अर्ज यशस्वीरीत्या दाखल झाला आणि एका कॅबिनेट मंत्र्याचे बिनविरोधचे दरवाजे बंद झाले.

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या नव्या निर्णयामुळे आता परिस्थिती आणखी रंजक झाली आहे. मंत्री मकरंद पाटील यांचे बंधू खासदार नितीन पाटील हे वाई तालुका सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. मात्र, त्यांची संचालक पदाची दहा वर्षे पूर्ण झाल्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत, वाईचा मतदारसंघ कुटुंबाकडेच टिकवण्यासाठी जर मंत्री मकरंद पाटील यांना त्या ठिकाणी उभे राहावे लागले, तर इकडे खरेदी-विक्री संघ मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विश्वास (बापू) निंबाळकर हे थेट बिनविरोध निवडून जाणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम मार्गदर्शनाखाली माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्हा बँकेसाठी अतिशय चोख आणि भेदक रणनीती आखल्याचे या संपूर्ण घडामोडींवरून स्पष्ट होते. राज्याच्या एका विद्यमान कॅबिनेट मंत्र्यालाही बिनविरोध होऊ न देता त्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरायला लावणे, हे रणजितदादांच्या राजकीय कौशल्याचे मोठे यश मानले जात आहे.

आता महायुतीमध्ये जिल्हास्तरीय वाटाघाटीत नेमके काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असले तरी, जिल्हा बँकेच्या या अटीतटीच्या निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचीच रणनीती आणि भूमिका निर्णायक ठरणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!