
थेट WhatsApp वर मिळवा
वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्याच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने मोठे बदल केले असून, यानुसार परवाना चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी आता ७५ टक्के गुण मिळवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
स्थैर्य,सातारा, दि. २३ ऑक्टोबर : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळवण्याच्या नियमांमध्ये सुधारणा करत नवीन मसुदा तयार केला आहे. या बदलांनुसार, आता लायसन्ससाठीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पूर्वीच्या ६० टक्क्यांऐवजी किमान ७५ टक्के गुण मिळवणे आवश्यक असणार आहे. तसेच किमान ३० मिनिटांच्या सुरक्षित वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणात सहभागी होणेही अनिवार्य करण्यात आले आहे.
नवीन नियमांचे स्वरूप आणि डिजिटल सेवा
नवीन परवाना काढताना किंवा नूतनीकरण करताना पारंपरिक कागदी कार्डऐवजी आता ‘फॉर्म ७’ सोबत एक मजबूत आणि वॉटरप्रूफ पीव्हीसी कार्ड दिले जाणार आहे. याशिवाय आधार पडताळणीद्वारे ऑनलाइन सेवांचा वापर करताना नाव आणि पत्ता बदलण्याचे शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. परवान्यावरील माहिती बदलण्यासाठी १५ दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल.
आक्षेप व सूचना मागवल्या
परिवहन मंत्रालयाने या नियमांचा मसुदा प्रसिद्ध केला असून, आगामी ३० दिवसांत नागरिक व तज्ज्ञांकडून त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतर हे नियम अंतिम करून देशभरात लागू केले जातील.





