
थेट WhatsApp वर मिळवा
सातारा जिल्हा बँकेच्या फलटण सोसायटी मतदारसंघात संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी झाले असले, तरी भाजपच्या समशेरसिंह निंबाळकर यांनी ६० मते मिळवत कडवी झुंज दिल्याने या निकालाची सर्वत्र चर्चा होत आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ३ नोव्हेंबर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अटीतटीच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. यामध्ये सर्वाधिक चुरशीच्या ठरलेल्या ‘फलटण तालुका सोसायटी मतदारसंघा’तून सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ७१ मते मिळवून विजय संपादन केला आहे. तर, त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी ६० मते घेत अत्यंत कडवी झुंज दिली.
रणजितदादांच्या नेतृत्वात विरोधकांना फोडला घाम
या निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सोसायटी मतदारसंघातून मोठे आव्हान उभे केले होते. अवघ्या १३१ मतांच्या या मतदारसंघात समशेरसिंह यांनी तब्बल ६० मते खेचून आणत प्रस्थापित विरोधी गटाला अक्षरशः घाम फोडण्याचे काम केले आहे. केवळ ११ मतांच्या फरकाने समशेरसिंह यांचा पराभव झाला असला, तरी त्यांनी दिलेली ही ऐतिहासिक लढत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावरील प्रस्थापितांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदाच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यात जिल्हा बँकेची निवडणूक इतक्या ताकदीने आणि आक्रमकपणे लढवली. स्वतः रणजितदादांनी ‘नागरी बँका व पतसंस्था’ मतदारसंघातून याआधीच बिनविरोध विजय मिळवून जिल्हा बँकेत धडक मारली आहे. त्यानंतर सोसायटी मतदारसंघातही त्यांच्या नेतृत्वाखालील उमेदवाराने ६० मते मिळवली आहे.
पहिल्याच प्रयत्नात भाजपाने आणि रणजितदादा गटाने दिलेली ही कडवी झुंज भविष्यातील राजकीय उलथापालथींची स्पष्ट नांदी मानली जात असून, विजयापेक्षाही समशेरसिंह यांनी मिळवलेल्या ६० मतांच्या मुसंडीचे राजकीय वर्तुळातून मोठे विश्लेषण केले जात आहे.





