समतानगरमध्ये ‘दर रविवारी चला बुद्धविहारी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; धम्मविचारांच्या मंथनाला सुरुवात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

समतानगर येथील पंचशील बुद्धविहारात न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाच्या पुढाकाराने नियमित बुद्धवंदना, सूत्रपठण आणि वैचारिक मंथन उपक्रमाची उत्साहात सुरुवात झाली आहे.

स्थैर्य, विडणी, दि. ०३ नोव्हेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या ‘दर रविवारी चला बुद्धविहारी’ या विचाराला कृतीची जोड देत मौजे समतानगर (विडणी) येथील न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाने नियमित बुद्धवंदना आणि धम्मविचारांच्या मंथनाचा उपक्रम सुरू केला आहे. समतानगर येथील पंचशील बुद्धविहारात बुद्धमूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी हा उपक्रम नियमितपणे राबविण्याचा संकल्प केला आहे.

उपक्रमाची सुरुवात व उपस्थितांचा सहभाग

नियोजनानुसार बुद्धविहारात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात बुद्धपूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बौद्ध उपासक, उपासिका, बालक-बालिका आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक बुद्धवंदना व सूत्रपठणानंतर भगवान बुद्धांच्या विचारांसह महापुरुषांच्या समतावादी विचारांचे मंथन करण्यात आले. कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेचे माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष रामचंद्र मोरे यांनी बुद्धवंदना व सूत्रपठणाचे संचलन केले.

पुढील नियोजन व प्रबोधनाचा उद्देश

सुरवडी गावचे सुपुत्र तुषार मोहिते यांनी बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी बुद्धविहारात नियमित कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाने हा उपक्रम प्रत्यक्षात सुरू केला आहे. पुढील रविवारपासून बुद्धविहारात बौद्ध धम्मातील विविध ग्रंथांचे क्रमशः वाचन सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे धम्माचे आकलन, वैचारिक जागृती आणि नव्या पिढीमध्ये बुद्धविचारांची रुजवणूक करण्याचा उद्देश आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!