समशेरसिंहांच्या पराभवानंतरही संचालक मंडळात रणजितदादांचा दबदबा कायम! ‘पतसंस्था’ मतदारसंघातून आधीच बिनविरोध एन्ट्री

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा जिल्हा बँकेच्या फलटण सोसायटी मतदारसंघात समशेरसिंह निंबाळकर यांना निसटता पराभव पत्करावा लागला असला, तरी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे बँकेवर भक्कम वर्चस्व कायम राहणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ३ नोव्हेंबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत फलटण तालुका सोसायटी मतदारसंघातून फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना जरी निसटता पराभव पत्करावा लागला असला, तरी जिल्हा बँकेच्या राजकारणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे भक्कम वर्चस्व कायम राहणार आहे. ‘नागरी बँका व नागरी सहकारी पतसंस्था’ मतदारसंघातून रणजितदादा आधीच बिनविरोध निवडून आले असल्याने, यंदाच्या संचालक मंडळात त्यांचा आश्वासक आवाज घुमणार असल्याचे स्पष्ट आहे.

नुकत्याच लागलेल्या निकालानुसार, सोसायटी मतदारसंघातून समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी तब्बल ६० मते घेत प्रस्थापितांना कडवी झुंज दिली. काही मतांच्या फरकाने ते जिल्हा बँकेत पोहोचू शकले नाहीत. समशेरसिंह यांची बँकेतील एन्ट्री हुकली असली, तरी भाजपचे नेते म्हणून स्वतः माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सातारा जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळात विराजमान असणार आहेत.

रणजितदादांनी ‘नागरी बँका व पतसंस्था’ या महत्त्वपूर्ण मतदारसंघातून अर्ज माघारीच्या दिवशीच सर्व विरोधकांना चीत करत आपला बिनविरोध विजय निश्चित केला होता. त्यामुळे फलटण सोसायटी मतदारसंघातील पराभवानंतरही, सहकाराच्या या सर्वोच्च सत्ताकेंद्रात रणजितदादांची भक्कम उपस्थिती असणार आहे.

आगामी पाच वर्षे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णयांमध्ये, शेतकरी हिताच्या योजनांमध्ये आणि जिल्ह्याच्या सहकार राजकारणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भूमिका अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!