सातारा जिल्हा बँक निवडणूक: महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच; अर्ज माघारीच्या टप्प्यात नवा ट्विस्ट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या एकत्र लढण्याच्या भूमिकेनंतरही पक्षांतर्गत आणि स्थानिक नेत्यांमध्ये जागावाटपावरून तीव्र रस्सीखेच सुरू आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०३ ऑक्टोबर : सहकाराचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) रणधुमाळीत महायुती म्हणून एकत्रित लढण्याची घोषणा झाली असली, तरी प्रत्यक्ष जागावाटपावरून घटक पक्षांमध्ये सुप्त संघर्ष उफाळून आला आहे. महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांच्या – भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना – दिग्गज नेत्यांनी आपापल्या समर्थकांचे उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणावर दाखल केल्याने स्थानिक पातळीवर तणाव वाढला आहे. अर्ज माघारीच्या मुदतीपर्यंत ही केवळ ‘डमी’ अर्जांची व्युहरचना ठरते की नेते आमने-सामने ठाकतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून सर्वाधिक जागांची मागणी; राष्ट्रवादीही आक्रमक

बँकेच्या एकूण २१ जागांपैकी भाजप सर्वाधिक ११ जागांवर दावा करत असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उर्वरित १० जागा देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. तथापि, बँकेवर दीर्घकाळ वर्चस्व राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद कायम ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे. माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी आपापले अर्ज दाखल करून राष्ट्रवादीची पकड मजबूत असल्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे, भाजपमध्येही अंतर्गत नेतृत्वातील गटबाजी आणि जागांची मागणी यामुळे तणावाचे वातावरण आहे.

‘वेट अँड वॉच’; अर्जांच्या छाननी आणि माघारीकडे लक्ष

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महायुतीच्या वतीने सन्मानजनक तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. मतांच्या टक्केवारीनुसार जागावाटप व्हावे आणि ९५ टक्के मतदार महायुतीच्या विचारांचे असल्याने तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, तालुक्यातील विकास सेवा सोसायटी गटात स्थानिक ताकदीवर लढाया होण्याची चिन्हे असल्याने संपूर्ण बँक निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच आहे. वरिष्ठ पातळीवरून युतीचे आदेश असले तरी कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांचे पुनर्वसन करण्यासाठी तिन्ही पक्ष ताणून धरण्याच्या भूमिकेत आहेत.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!