
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत मुधोजी हायस्कूलच्या संघाने १४, १७ आणि १९ वर्षांखालील तिन्ही गटांत चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 03 ऑक्टोबर : अभियांत्रिकी महाविद्यालय ठाकूरकी येथे पार पडलेल्या फलटण तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने १४, १७ आणि १९ वर्षांखालील तिन्ही गटांत उत्कृष्ट कामगिरी करत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. या स्पर्धेत मुधोजी हायस्कूलच्या मुलांच्या संघांनी अंतिम सामन्यांमध्ये विजय मिळवून विजेतेपदाच्या चषकावर आपले नाव कोरले.
१४ आणि १७ वर्षांखालील गटात रोमहर्षक विजय
१४ वर्षांखालील गटाचा अंतिम सामना मुधोजी हायस्कूल आणि शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना मुधोजी हायस्कूलने ५ षटकांत ४४ धावा केल्या. यामध्ये सिद्धेश घनवट, हर्षदीप चौहान आणि रागवीर पवार यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल शिवाजीराजे स्कूलचा संघ ३४ धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि मुधोजीने हा सामना १० धावांनी जिंकला. १७ वर्षांखालील गटात व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. मुधोजी हायस्कूलने प्रथम फलंदाजी करत ४६ धावा केल्या. व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलला केवळ ३९ धावा करता आल्याने मुधोजीने हा सामना ८ धावांनी जिंकून चषक पटकावला.
१९ वर्षांखालील गटात मालोजीराजे शेती शाळेवर मात
१९ वर्षांखालील गटात मुधोजी हायस्कूलच्या मुलांनी प्रथम फलंदाजी करताना ५ षटकांत बिनबाद १०७ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये श्रवण खाडे याने नाबाद ४२ तर विनायक दळवीने नाबाद २७ धावांची खेळी केली. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मालोजीराजे शेती विद्यालय संघाला ३ गड्यांच्या मोबदल्यात केवळ ४५ धावा करता आल्या. मुधोजी हायस्कूलने हा सामना ६२ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून स्पर्धेत वर्चस्व सिद्ध केले.
मान्यवरांकडून विजेत्या खेळाडूंचे कौतुक
या स्पर्धेप्रसंगी फलटण तालुका क्रीडा संघटनेचे तायप्पा शेंडगे, उत्तमराव घोरपडे यांच्यासह पदाधिकारी व पंच उपस्थित होते. मुधोजी हायस्कूलच्या या अभूतपूर्व यशाबद्दल आमदार रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि शिक्षकांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे कौतुक करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.



