वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणार; जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी राज्य सरकार आणि विमा कंपनीकडे तातडीने सुधारित प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २० सप्टेंबर : कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन आणि परिसरातील महत्त्वाचे नगदी पीक असलेल्या वाघ्या घेवड्याचा खरीप पीकविमा योजनेत समावेश करण्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित विमा कंपनीकडे तातडीने सुधारित प्रस्ताव पाठवला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहे. वाठार स्टेशन आणि विखळे परिसरात खरीप पिकांची पाहणी करताना त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.

वाघ्या घेवडा पिकाला मिळणार संरक्षण

सातबारा उताऱ्यावर खरीप पिकांची नोंदणी आणि ई-पीक पाहणीच्या कामाचा आढावा घेत असताना स्थानिक शेतकऱ्यांनी वाघ्या घेवड्याचा पीकविमा भरता येत नसल्याची अडचण जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. हे पीक सध्या पालेभाजी वर्गात मोडत असल्याने चालू खरीप पीकविमा योजनेत त्याचा समावेश झालेला नाही. मात्र या भागातील शेतकऱ्यांचे हे मुख्य नगदी पीक असल्याने त्याचा खरीप पिकांच्या यादीत समावेश करण्यासाठी महसूल प्रशासनामार्फत पाठपुरावा केला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

ई-पीक पाहणीचे तांत्रिक अडथळे दूर करण्याचे आदेश

या पाहणीदरम्यान ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणी दूर करून सातबारा नोंदणी वेळेत आणि अचूक पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महसूल यंत्रणेला दिले. शेतकऱ्यांनी ॲपद्वारे पिकांची प्रत्यक्ष नोंदणी करावी, तसेच महसूल सहाय्यक, तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नोंदणीत येणाऱ्या अडचणी समजून घेऊन मदत करावी, असे आदेशही त्यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट बांधावर जाऊन घेतलेल्या या भूमिकेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

 

 

Back to top button
Don`t copy text!