
थेट WhatsApp वर मिळवा
गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय १२५ कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती सचिन यादव यांनी दिली.
स्थैर्य, फलटण, दि. २० सप्टेंबर : सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाचे सक्षम नेतृत्व आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे गॅलेक्सी प्लस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, फलटणची आर्थिक प्रगती सुरू असून, संस्थेने सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला आहे. दरवर्षीप्रमाणे संस्थेला यंदाही ऑडिट ‘अ’ वर्ग मिळाल्याची माहिती संस्थापक चेअरमन सचिन यादव यांनी दिली.
ठेवी ७० कोटी; कर्जवाटप ५५ कोटी
संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना सचिन यादव यांनी सांगितले की, संस्थेच्या एकूण ९ शाखा कार्यरत असून ७० कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. सभासदांच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ५५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून, संस्थेचा एकत्रित व्यवसाय १२५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
सभासदांना अधिक गतिमान आणि सुलभ सेवा देण्यासाठी संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. गोल्ड टेस्टिंग मशीन, मोबाईल बँकिंग आणि डिजिटल पिग्मी यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, ग्राहकांना त्याचा लाभ मिळत असल्याचे यादव यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात शाखा विस्तारावर भर
संस्थेने पुणे जिल्ह्यातही विस्तार सुरू केला असून आंबेगाव येथे शाखा सुरू करण्यात आली आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने पुढील काळात आणखी शाखा सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही सांगण्यात आले.
सर्व गॅलेक्सी ग्रुप ऑफ संस्थांच्या ठेवी १०० कोटी रुपयांच्या जवळपास असून, ग्राहकांच्या प्रतिसादामुळे संस्था महाराष्ट्र आणि कर्नाटकात नावारूपाला येत असल्याचे संचालक गणेश निकम यांनी नमूद केले.