
सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली असून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०२ ऑक्टोबर : सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे आरोग्य केंद्र असलेल्या साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) परिसरात सध्या स्वच्छतेचा मोठा बोजवारा उडाला आहे. रुग्णालयाच्या मोकळ्या जागेत आणि मुख्य इमारतीच्या आवारात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून पसरलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे रुग्णांना उपचारांऐवजी नवीन आजार जडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कचरा आणि सांडपाण्याचे साम्राज्य
रुग्णालय आवारात बायोमेडिकल वेस्टसह रोजचा वापरलेला कचरा उघड्यावर फेकून दिला जात आहे. अनेक दिवसांपासून हा कचरा उचलला न गेल्याने त्याचा कुजणारा दर्प संपूर्ण परिसरात पसरला आहे. याशिवाय सांडपाण्याच्या वाहिन्या तुंबल्याने अस्वच्छ पाणी उघड्यावर साचत असून तिथे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आजार दूर पळवण्यासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना अस्वच्छतेच्या या वातावरणात दिवस काढावे लागत आहेत.
प्रशासकीय दुर्लक्ष अन् रुग्णांचे हाल
जिल्ह्यातून हजारो नागरिक दररोज या रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, मुख्य प्रवेशद्वारापासून ते विभागांच्या मागील बाजूपर्यंत सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. स्वच्छता कंत्राटदारांचे ढिसाळ नियोजन आणि रुग्णालय प्रशासनाचे याकडे असलेले दुर्लक्ष यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालय प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी, अशी जोरदार मागणी रुग्ण व नागरिकांमधून केली जात आहे.



