
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी राजकीय हालचाली तीव्र झाल्या असून विविध मतदारसंघांतून अर्जांचा पाऊस पडत आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०१ ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्जांचा ओघ वाढला असून प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी आपली दावेदारी सादर केली आहे. दिवसभरात १४ उमेदवारांचे १५ अर्ज दाखल झाल्याने आतापर्यंत एकूण ७४ उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा झाले आहेत. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत.
दिग्गज नेत्यांची निवडणुकीच्या मैदानात उडी
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, उदयसिंह पाटील-उंडाळकर, मनोज पोळ, सुभाष नरळे, राजेश पाटील, ऋतुजा पाटील आणि रवींद्र बडेकर यांसारख्या प्रमुख नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापूर्वी खासदार उदयनराजे भोसले आणि संजीवराजे भोसले यांच्यासह प्रमुख नेत्यांनीही अर्ज दाखल केले असून, त्यामुळे विविध मतदारसंघांत चुरस निर्माण झाली आहे.
निवडणूक कार्यक्रम आणि राजकीय गणिते
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबर रोजी मतदान आणि ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. १ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून ५ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ६ ते २१ ऑक्टोबरपर्यंत आहे. अर्ज माघारीच्या मुदतीनंतरच निवडणुकीचे अंतिम आणि स्पष्ट राजकीय चित्र समोर येणार असले तरी सध्याच्या उमेदवारी अर्जांवरून महायुतीतील घटक पक्ष व स्थानिक गटांमध्ये राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.



