सातारा जिल्हा बँक निवडणूक: खरेदी-विक्री संघातून विश्वास (बापू) निंबाळकर भरणार रणजितदादांच्या नेतृत्वात उमेदवारी अर्ज! दोन बड्या नेत्यांच्या साथीने फलटणच्या पश्चिम भागात रणजितदादांचे एकहाती वर्चस्व

सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी खरेदी विक्री संघातून विश्वास निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे फलटण तालुक्यात राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. १ ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचा रणसंग्राम आता अधिकच तीव्र झाला आहे. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी फलटण तालुका खरेदी-विक्री संघाचे विद्यमान चेअरमन विश्वास निंबाळकर हे खरेदी-विक्री मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली जोरदार शक्तिप्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने फलटणच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पश्चिम भागात वाढले रणजितदादांचे एकहाती वर्चस्व

दोनच दिवसांपूर्वी आदर्की बुद्रुक येथील प्रमुख नेते बाळासाहेब कासार यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला होता. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर आता आदर्की खुर्द येथील विश्वास निंबाळकर यांनीही रणजितदादांच्या नेतृत्वाखाली आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. लागोपाठ घडलेल्या या दोन मोठ्या राजकीय घडामोडींमुळे फलटण तालुक्याचा संपूर्ण पश्चिम भाग आता खंबीरपणे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभा राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषद गटांमधील राजकीय समीकरणे बदलणार

बाळासाहेब कासार आणि विश्वास निंबाळकर या पश्चिम भागातील दोन दिग्गज नेत्यांच्या साथीमुळे फलटण तालुक्यातील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन्ही नेत्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आगामी काळात तालुक्यातील तब्बल तीन जिल्हा परिषद गटांमध्ये मोठा राजकीय फरक पडणार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. या नव्या घडामोडींमुळे तालुक्यात रणजितदादा गटाची ताकद आणि वर्चस्व लक्षणीयरीत्या वाढले असून, आगामी निवडणुकांमध्ये याचे मोठे पडसाद पाहायला मिळणार आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!