भुईंज पंचक्रोशीत डेंग्यूचा हाहाकार; २५० हून अधिक रुग्ण आढळल्याने नागरिक भयभीत

सातारा जिल्ह्यातील भुईंज आणि परिसरात डेंग्यूची तीव्र साथ पसरली असून तब्बल २५० हून अधिक रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे.

स्थैर्य, सातारा , दि. ०२ ऑक्टोबर : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज आणि परिसरातील गावात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. भुईंज पंचक्रोशीत गेल्या काही दिवसांत डेंग्यूसदृश आजाराचे २५० हून अधिक रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अचानक रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने स्थानिक खाजगी दवाखाने तसेच शासकीय रुग्णालये हाऊसफुल्ल झाली असून आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.

आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष; खाजगी रुग्णालये हाऊसफुल्ल

सतत पडणारा पाऊस आणि साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती झाली आहे. स्थानिक ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाकडून वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्याने साथीचा प्रसार वेगाने झाल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. रुग्णसंख्या अडीचशेच्या पार गेल्याने स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रचंड ताण पडत आहे. अनेक रुग्णांना उपचारासाठी वाई आणि साताऱ्याच्या खाजगी रुग्णालयांत धाव घ्यावी लागत आहे.

तात्काळ फवारणी आणि उपाययोजनांची मागणी

डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भुईंजसह आसपासच्या सर्व गावांमधील प्रत्येक घरात तापाचे रुग्ण पाहायला मिळत आहेत. आरोग्य विभागाने तातडीने विशेष वैद्यकीय पथके तैनात करून गावागावांत सर्वेक्षण सुरू करावे, डास प्रतिबंधक औषधांची धूर फवारणी करावी आणि पाण्याचे साठे स्वच्छ करण्याबाबत मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!