दैनिक स्थैर्य | दि. ४ सप्टेंबर २०२३ | फलटण |
जालना येथील मराठा समाज आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या ‘बंद’ला सातारा शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सातारा शहरात सर्व व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवली होती. बंदमुळे सकाळपासूनच सातारा शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट होता.
सोमवारी सकाळी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमले. यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पदाधिकार्यांशी चर्चा केली. समीर शेख यांनी कायदेशीर मार्गाने निवेदन सादर करण्याचे आवाहन केले. यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
समाजाला आरक्षण द्यावे आणि मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा निषेध करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली. एक मराठा लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर मराठा मोर्चाच्या वतीने पोलिस मुख्यालयात जाऊन पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
सातारा जिल्ह्यतील कायदा व सुव्यवस्था आबधित राखण्यासाठी सातारकरांनी नेहमीच सहकार्य केले आहे. ती परंपरा कायम ठेवत आपल्या मागण्या कायदेशीर मार्गाने मांडाव्यात. यासाठी लागणारे संपूर्ण सहकार्य करण्यास प्रशासन तयार असल्याचे आवाहन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले.
महाविद्यालये बंद असल्याची कल्पना नसल्यामुळे शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना माघारी जावे लागले. काही शैक्षणिक संस्थांनी आदल्या दिवशीच सुट्टी जाहीर केली होती.
बाजार समितीमध्ये नेहमीइतकी भाजीपाल्याची उचल झाली नाही. त्यामुळे सोमवारी मोठ्या प्रमाणावर शेतमाल पडून राहिला. कोथिंबीर आणि मेथीच्या पेंढ्यांचे ढीग बाजार समितीच्या आवारात दिसून येत होते.